Ude Ga Ambe New Marathi Serial : छोट्या पडद्यावर नवी पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. 'विठुमाऊली' आणि 'दख्खनचा राजा जोतिबा'च्या यशानंतर आता 'उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची' ही मालिका स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेतून साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व व इतिहास मांडण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही.
स्टार प्रवाहने या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये भगवान शिवशंकरच्या भूमिकेत देवदत्त नागे (Devdatta Nage) पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे देवदत्त नागे या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर 'स्टार प्रवाह'च्या मालिकेत झळकणार आहे. 'देवयानी' या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता तो पुन्हा एकदा 'स्टार प्रवाह'बरोबर जोडला जातोय. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला आहे.
देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.