गेल्या काही काळामध्ये छोट्या पडद्यावर अनेक पौराणिक आणि धार्मिक मालिकांची निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता कोकणातील जागृत देवस्थान श्री देव वेतोबा यांच्या महिमा उलगडणारी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १७ जुलै रोजी सुरु झालेली ही मालिका पहिल्या भागापासून चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत वेतोबाची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता चर्चेत आला आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
या मालिकेमध्ये वेतोबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव उमाकांत पाटील असं आहे. विशेष म्हणजे त्याने यापूर्वी बॉलिवूडसहहॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. उमाकांतने 'गंगुबाई काठियावाडी', 'सूर्यवंशी' आणि 'सर्कस' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच त्याने हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. उमाकांत याने हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर त्याने मराठीमध्येही छोट्या पडद्यावर काम केलं आहे. 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' या मालिकेपूर्वी तो 'गाथा नवनाथांची' या मालिकेत झळकला होता.
दरम्यान, ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेत त्याच्यासोबत दीपक कदम, निकिता साळगावकर ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत. ही मालिका कोकणवासीयांचं श्रद्धास्थान असलेल्या वेतोबा या देवतेवर आधारित आहे. वेतोबा म्हणजेच भूतनाथ पण लोकांच्या हाकेला तो धावून येतो म्हणून त्याला देवाचे स्थान दिले आहे. कोणालाही रस्त्यात चकवा लावला, त्याच्यावर संकट ओढवले की हा वेतोबा भक्तांना मार्ग दाखवतो. संकटातून बाहेर काढतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.