‘उंच माझा झोका’ मालिकेतून न रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास उलगडला गेला होता. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. या मालिकेत त्या भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक झालं. या मालिकेला उलटून बरीच वर्षे झाली आहेत. नुकतेच तेजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आठवणींना उजाळा दिला.
तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहलं, 'अकरा वर्षांनी पुन्हा एकदा नऊवारी नेसून तयार झाले...तयार झाल्यावर माझ्यासोबत लोकेशनवर असलेल्या प्रत्येकाच्या ओठात उंच माझा झोकाच गाण आलं..आणि ते गुणगुणायला लागले....जणू एकदम 11 वर्ष मागे गेल्या सारखं वाटायला लागलं....आणि सर्वांच्या मनात असलेल उंच माझा झोकाच अढळ स्थान आणि प्रेम हे 11 वर्षांनी कदाचित तेवढ्याच किंवा त्या पेक्षाही जास्त पटीने वाढलंय अस जाणवलं..माझ्या सोबत असलेल्यांनी लगेच दोन्ही videos एकत्र करून हा सुंदर प्रवास टिपला'.
तेजश्रीने 'उंच माझा झोका' मालिकेनंतर एका मालिकेत काम केलं होतं. मात्र त्यानंतर तिने अभिनय सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. 'आजी आणि नात', 'चिंतामणी', 'मात' यांसारख्या सिनेमांमध्ये तेजश्रीनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून काम करत असलेल्या तेजश्रीनं मालिकेसह अनेक बालनाट्य, बालचित्रपट, लघुपटांमध्ये काम केलंय. ती सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.