Join us

​नकळत सारे घडले या गाण्याचा गीतकार आहे एक ऑफिसबॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 9:41 AM

​नकळत सारे घडले या गाण्याचा गीतकार एक ऑफिसबॉय असून स्टार प्रवाह आणि या मालिकेच्या टीमने त्याला दिलेल्या या संधीबद्दल तो प्रचंड खूश आहे.

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या नकळत सारे घडले या मालिकेच्या गीतकाराची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. ऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा प्रवास निलेश उजाळ या नव्या दमाच्या तरुण गीतकाराने केला आहे. स्टार प्रवाहच्या नकळत सारे घडले या मालिकेचे टायटल साँग निलेशच्या लेखणीतून उतरले आहे. संगीतकार निलेश मोहरीरने आपले एखादं तरी गाणे संगीतबद्ध करावे, हे त्याचे स्वप्नही या टायटल साँगच्या रूपाने स्टार प्रवाहने सत्यात उतरवले आहे.स्टार प्रवाहवर २७ नोव्हेंबरपासून नकळत सारे घडले ही नवी मालिका सुरू झाली. अभिनेता स्वप्निल जोशी याच्या जीसिम्स या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. स्वप्निल जोशी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बालकलाकार सानवी रत्नाळीकर यांच्यासह अनेक उत्तम कलाकार या मालिकेत आहेत. या मालिकेचे टायटल साँग निलेश उजाळ या नव्या दमाच्या गीतकाराने लिहिले आहे. मालिकेचे टायटल साँग लिहिण्याचा निलेशचा हा पहिलाच प्रयत्न आहे हे विशेष.निलेश एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. तो सांगतो, नकळत सारे घडले या मालिकेचे टायटल साँग लिहिण्याचा अनुभव फारच उत्तम होता. मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो, तिथले माझे सर माझ्या कविता लिखाणाला प्रोत्साहन द्यायचे. कवी संमेलनाला जाण्यासाठी सुट्टीही द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्राबणी देवधर यांनी माझ्या काही कविता तिथेच वाचल्या होत्या. एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतले. माझ्यासमोर एक कथा ठेवली आणि त्या कथेवर गाणे लिहायला सांगितले. मी ती कथा वाचली आणि गाणे लिहून दिले. श्राबणी ताईंना ते गाणे आवडले आणि हे गाणे नकळत सारे घडले या मालिकेचे टायटल साँग म्हणून आपल्यापुढे आले. श्राबणी ताईंचा आणि स्टार प्रवाहचा मी यासाठी ऋणी आहे.' नकळत सारे घडले या गाण्याचे टायटल साँग निलेश मोहरीरीने संगीतबद्ध केले आहे. स्टार प्रवाहबरोबरचे निलेश मोहरीरचे नाते हे जुने आहे. अंतरपाठ, तुजवीण सख्या रे, मांडला दोन घडीचा डाव, धर्मकन्या, पुढचं पाऊल, गणा धाव रे, दोन किनारे दोघी आपण, आराधना, स्वप्नांच्या पलीकडले पर्व २ आणि गोठ अशी एकूण दहा गाजलेली शीर्षक गीते ही निलेशचीच आहेत. नकळत सारे घडले या नव्या टायटल साँगविषयी निलेश सांगतो, या गाण्याचा माझा अनुभव कमाल होता. स्वप्निलने मला गाण्याचे शब्द पाठवले. मी शब्द वाचले आणि क्षणात लक्षात आले की, हे गाणे नेहमीच्या गीतकारांपैकी कोणी लिहिलेले नाही. मग मी स्वप्निलला फोन करून गीतकाराबद्दल विचारले. स्वप्निलने मला निलेशबद्दल सांगितले आणि मला सुखद धक्का बसला. कारण, त्याने अत्यंत सोपे आणि ओघवते शब्द लिहिले होते. त्याच्या गाण्यावर मला फार मेहनत करावी लागली नाही. त्यावर मला अगदी सहजपणे चाल सुचली. मला आनंद आहे की, हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. निलेश उजाळच्या कामाची चीज होत आहे असे म्हणायला हरकत नाही.Also Read : ​नकळत सारे घडले या मालिकेतील परीची १०० मुलांच्या ऑडिशनमधून झाली निवड