मेरे साईच्या टीमला एका फॅनकडून मिळाली अनोखी भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 9:48 AM
मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई ...
मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत साईंची भूमिका अबीर सुफी, झिपरीची भूमिका धृती मंगेशकर, कुलकर्णींची भूमिका वैभव मांगले तर चिऊताईची भूमिका शर्मिला राजाराम साकारत आहे. या मालिकेत नुकतेच दिवाळीच्या सणाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळेचा या मालिकेच्या टीमचा अनुभव खूपच चांगला होता.घराघरात लावल्या जाणार्या पणत्या या दिवाळीच्या पारंपरिकतेचे प्रतीक आहे. पणत्यांच्या रोषणाईमुळे घरात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. मालिकेत खास दिवाळीचे दृश्य नुकतेच चित्रित करण्यात आले. या चित्रीकरणामुळे या मालिकेच्या टीमला दिवाळी कित्येक महिने आधीच साजरी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.मेरे साई या मालिकेच्या येत्या भागांमध्ये वस्तीमधील गावकरी आणि द्वारकामाई यांच्यातील तणाव साईंच्या आणि झिपरीच्या हस्तक्षेपाने संपणार आहे आणि दिवाळी साजरी करण्यासाठी झिपरी संपूर्ण गाव दिव्यांनी उजळून टाकण्याचे ठरवणार आहे. हे दृश्य अधिकाधिक चांगले दिसावे आणि हा क्षण सर्वांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी या मालिकेच्या प्रॉडक्शन टीमने सर्व तर्हेचे प्रयत्न केले. या दृश्यासाठी सेटवर जय्यत तयारी सुरू होती. पणत्यांनी सजावट करण्यासोबतच मोठाल्या रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. हे सगळे सुरू असतानाच या मालिकेच्या टीमला एक खूप छान सरप्राईज मिळाले. हाताने बनवलेल्या पणत्यांचे एक खोके एका साई भक्ताने प्रॉडक्शन हाऊसला आणून दिले. या महिला भक्तास तिचे नाव उघड होऊ द्यायचे नव्हते. परंतु आपल्या परीने या सोहळ्यास हातभार लावायचा होता. ती साईंची अनुयायी आहे आणि अनेक वेळा सेटवर येत असते. सेट तिच्यासाठी जणू दुसरे घरच बनले आहे. तिला जेव्हा दिवाळीच्या दृश्याबद्दल समजले तेव्हा तिने दिवे बनवण्यास सुरुवात केली आणि योग्य वेळी चित्रीकरणासाठी या पणत्या सेटवर पाठवल्या. या पणत्यांमुळे मालिकेतील दिवाळीच्या चित्रीकरणाला चार चाँद लागले. Also Read : मेरे साई या मालिकेतील अबीर सुफी आणि धृती मंगेशकर यांच्यात झाली मैत्री