अजूनही उलगडले नाही प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूचे गूढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 06:41 PM2021-03-03T18:41:59+5:302021-03-03T18:45:00+5:30
प्रत्युषाने सगळ्यांना एप्रिल फुल बनवत गुगली टाकली असावी असेच त्यावेळी सगळ्यांना वाटले, मात्र तो दिवस प्रत्युषाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.
प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 ला मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केली होती. प्रत्युषाने सगळ्यांना एप्रिल फुल बनवत गुगली टाकली असावी असेच त्यावेळी सगळ्यांना वाटले, मात्र तो दिवस प्रत्युषाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. रिल लाईफमध्ये खंबीर दिसणाऱ्या प्रत्युषाला रिअल लाईफमध्ये स्वत:चे आयुष्य संपवावेसे का वाटले? या एकाच प्रश्नाने चाहत्यांनाही अस्वस्थ करून सोडले होते.
छोट्या पडद्यावरील आनंदी ही भूमिका तुफान गाजली. आनंदी या भूमिकेला रसिकांनी भरभरून प्रेम दिले. बालिका वधू मालिकेतून छोटी आनंदी बनत अविका गौरने बालविवाहविषयी रसिकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले. अल्पावधीतच मालिका नंबर 1 मालिका बनली. त्यानंर मालिकेने लीप घेत मोठ्या आनंदीने एंट्री घेतली. एका काँटेस्टद्वारे प्रत्युषाची मोठ्या आनंदीसाठी निवड करण्यात आली. बालपणीची आनंदी तर घराघरात भावली होती. त्यानंतर मोठी झालेली आनंदी कशी असेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आनंदीच्या भूमिकेला पूर्ण न्याय देत रसिकांचा विश्वास मिळवला.
आनंदी म्हणून प्रत्युषा घराघरातून रसिकांच्या मनात पोहचली. बालिका वधू लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मात्र अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि काही वादामुळे प्रत्युषाला मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली. त्यानंतर झलक दिखला जाच्या 5 व्या सिझनमध्ये प्रत्युषा झळकली. मात्र पुन्हा एका सगळ्यात वादग्रस्त शो 'बिग बॅास' मध्ये तिने एंट्री केली.
अभिनेता राहुल राज सिंग याच्यासोबत प्रत्युषा रिलेशनशिपमध्ये होती. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. राहुलमुळेच तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रमैत्रिणींना लावला होता. त्यामुळे राहुुलला अटक देखील करण्यात आले होते. पण प्रत्युषाने आर्थिक तणावातून आत्महत्या केली असावी असे राहुलने कोर्टात दिलेल्या जमीन अर्जामध्ये म्हटले होते. तिच्यावर चार बँकांचे कर्ज होते. ज्याचे हफ्ते तिला भरता येत नव्हते. मला तिच्याशी लग्न करायचे होते, मी तिला एक हिऱ्याची अंगठी देखील दिली होती, असे त्याने म्हटले होते.