या वीकएंडला द कपिल शर्मा शो सलीम-सुलेमान या संगीतकार जोडीच्या संगतीत स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. सलीम-सुलेमान जोडीने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. खास रसिकांसाठी हा एपिसोड अधिक रंजक बनवण्यासाठी या दोघांना आमंत्रित करण्यात आले होते. आपली काही सुमधुर गाणी सादर करून कार्यक्रमाला चार चांद लावले. यावेळी 'चक दे !' इंडिया सिनेमाच्या पडद्यामागचे गंमतीदार किस्से त्यांनी सांगितले.
कपिल म्हणाला की, कोणताही विजय प्रसंग असला तरी, या गाण्यातून सामान्य माणसाच्या भावना सुंदरपणे व्यक्त होतात. हे गाणे फक्त प्रेरणादायीच नाही, तर थेट मनाला भिडणारे आहे. हे गाणे कसे तयार झाले याबद्दल त्या दोघांना विचारले असता, सुलेमानने सांगितले, “त्याची सुरुवात म्हणजे, सिनेमाचे नावच होते. 'चक दे ! इंडिया'. सिनेमाची कथा आम्ही जेव्हा ऐकली, तेव्हा आम्हाला हे प्रकर्षाने जाणवले की एका सळसळत्या देशभक्ती गीताची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही अशा एका गीतावर काम करू लागलो, ज्यात खूप अर्थ दडला होता. पण सिनेमाच्या निर्मात्यांना ते आवडले नाही. त्याला वाटले, की ते गीत सिनेमात चपखल बसत नाहीय. त्यामुळे आम्ही त्या गीताच्या खूप वेगवेगळ्या, सुमारे 7-8 चाली बनवल्या.”
सलीमने पुढे सांगितले की, “आम्ही दुसर्यांदा जे गाणे तयार केले होते, ते खूप दमदार होते. त्याचा ठेकाही मस्त होता. पण त्यात आत्मा हरवत होता. त्यानंतरच्या अनेक चाली नाकारल्या गेल्या. त्यानंतर मी सुलेमानला म्हटले की आपण हा सिनेमाच करायला नको. मला वाटले की, जर आपण आपल्या गीतांद्वारे या सिनेमाला न्याय देऊ शकत नसू, तर हे काम न केलेलेच बरेच आहे. पण मला सुलेमानने सांगितले की, ‘कोशिश करते हैं, कुछ करते हैं.. कुछ करते हैं... आणि अशा प्रकारे, ‘कुछ करिये... कुछ करिये’ सापडले. त्यानंतर आम्ही तत्काळ जयदीप साहनींना भेटलो, जे या सिनेमाचे लेखक आहेत. त्यांनी आम्हाला “कुछ करिये... कुछ करिये... नस नस मेरी खोले” तयार करण्यात मदत केली आणि मग जे घडले तो इतिहास ठरला.