Join us

'निवेदिता माझी ताई' मधून उलगडणार भावा-बहिणीचं सुरेख भावविश्व; नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 19:17 IST

Nivedita Mazi Tai: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे अनेक प्रोमो व्हायरल होत आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात सध्या अनेक नवीन मालिकांची भर  पडत आहे. सध्या सोशल मीडियावर एका नव्या मालिकेची चर्चा रंगली आहे. सोनी मराठीवर सध्या अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती होताना दिसत आहे. यामध्येच आता या वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेतून बहीण-भावाचं नातं उलगडलं जाणार आहे.

छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ... या कवितेच्या ओळी आठवल्या की मनात आपल्या बालपणीच्या आठवणी हमखास जाग्या होतात. कितीही भांडणं झाली तरीही बहीण-भावाचं नातं म्हणजे 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' असंच काहीसं असतं. त्यामुळे या नात्यावर भाष्य करणारी निवेदिता, माझी ताई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 'निवेदिता, माझी ताई!' या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत एतशा संझगिरी आणि तिच्या लहान भावाच्या भूमिकेत रुद्रांश चोंडेकर झळकणार आहे. तर अभिनेता अशोक फळदेसाई हा यशोधन ही भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, या मालिकेत यशोधन आणि निवेदिता यांची मॅजिकल लव्हस्टोरी मालिकेचा टर्निंग पॉइंट असणार आहे. निवेदिता, असीम आणि यशोधन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट 'निवेदिता, माझी ताई!' या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोधनची स्वप्नपरी या दोघांच्या निर्व्याज प्रेमात निवेदिताला तारेवरचीच कसरत करावी लागणार हे नक्की.  ही मालिका येत्या १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी