महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे - वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
झी मराठीवर 'सत्यवान सावित्री' (Satyavan Savitri) ही पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये एक मोठा वटवृक्ष दिसून येत आहे. सोबतच सत्यवान-सावित्रीची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रोमो पाहिल्यानंतर आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्नही प्रेक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. मात्र, या मालिकेविषयी अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या मालिकेत कोणते कलाकार झळकणार, मालिकेची निर्मिती, दिग्दर्शन कोणी केलंय? या मालिकेची वेळ काय? किंवा कोणत्या जुन्या मालिकेच्या जागी ही नवी मालिका येणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, लवकरच या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहेत.