झी मराठीवर सध्या 'शिवा' या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेमध्ये शिवा ही मध्यवर्ती पात्र असून मालिकेचं संपूर्ण कथानक त्याच्याभोवती फिरताना दिसतं. अभिनेत्री पूर्वा कौशिकने ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच रांगड्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या पूर्वाला ही भूमिका कशी मिळाली हे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
"मी CHM कॉलेज उल्हासनगरला शिकत असल्यापासूनच एकांकिका करत आहे. त्यामुळे, राज्य नाट्य, कमर्शिअल नाटकं केली आणि त्यानंतर छोट्या पडद्यावर आले. थिएटर केल्यामुळे खूप गोष्टी वेगळ्याने जाणवल्या. मकरंद देशपांडे यांच्या अंश या थिएटरमध्ये मी काम करत होते. यामध्ये सरांची ३ नाटकं मी केली. मी पहिल्यांदा २०१० ला एक ऑडिशन दिलं होतं. पण, मला ते काम माझ्या एका एकांकिकेमुळे मिळालं होतं. पण, काही कारणास्तव मी तो प्रोजेक्ट करु शकले नाही. फ्रेशर ही माझी पहिलीच मालिका होती जिच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर अभिनय केला", असं पूर्वा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "काही महिन्यांपूर्वी मी कामाच्या शोधात होते. याच वेळी नायिकेची भूमिका असेल तरच काम करायचं असं मी ठरवलं होतं. एक दिवस अचानक मला माझ्या सोशल मीडियावर 'जगदंब प्रोडक्शन ' मधून मेसेज आला की 'तू ऑडिशनला येऊ शकशील का?' तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला नायिकेची भूमिका आहे का?' समोरुन हो असा रिप्लाय आल्यानंतर मग पुढे शिवाचा हा प्रवास सुरु झाला. आम्ही खूप वर्कशॉप्स केले. त्यानंतर बरेच लूक टेस्ट केले अंदाजे २५ तरी कपडे ट्राय केले होते. पण जेव्हा प्रोमो पाहिला तेव्हा सगळी मेहनत स्क्रीनवर पाहून समाधान वाटलं. या भूमिकेसाठी मी बाईक शिकले."
दरम्यान, "माझ्याकडे ऍक्टिव्हा आहे पण बाईक चालवायला मी वर्कशॉपमध्ये शिकले. आता मी आर.एक्स १०० बाईक चालवते जे तुम्हाला प्रोमोमध्ये आणि मालिकेमध्ये ही पाहायला मिळेल. जेव्हा माझी निवड झाली आणि वर्कशॉप सुरु झाले तेव्हा मी कोणालाच सांगितले नव्हतं. पहिला प्रोमो जेव्हा माझ्या कुटुंबाने आणि इंडस्ट्रीच्या मित्रानी पाहिला तेव्हा ते प्रचंड खुश झाले. खूप छान प्रतिसाद मिळाला मला प्रोमो पाहून", असंही पूर्वा म्हणाली.