‘बिग बॉस ओटीटी’मधून उर्फी जावेद (Urfi Javed) प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचंलक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. बोल्ड लुकमुळे उर्फी अनेकदा ट्रोल होते. या ट्रोलिंगची उर्फीला अजिबात पर्वा नाही. पण सध्या मात्र ती जाम भडकलीये. होय, राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करण्यासाठी तिच्या नावाचा वापर झाल्यानं तिचा पारा चढला आहे. गुजरात भाजप कार्यकर्ता दिनेश देसाई यांना तिने सणसणीत उत्तर दिलं आहे.
आता ही नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर सध्या दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी टी-शर्ट घालून फिरत असल्याचा मुद्दा गाजतो आहे. अशावेळी राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी भाजपाने उर्फीच्या नावाचा वापर केला आणि उर्फी भडकली.
भारत जोडो यात्रेदरम्यान दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी टी-शर्टवर फिरत आहेत. साहजिकच राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपाने यावरून खोचक टोलेबाजी सुरू केली असतानाच गुजरात भाजप नेते दिनेश देसाई यांनी राहुल गांधींवर एक उपहासात्मक ट्वीट केलं. हे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड असून त्यावर भाजपा कार्यकर्ता, मालधारी सेना गुजरात असंही लिहिण्यात आलं आहे.
राहुल गांधींची तुलना उर्फीशी...
दिनेश देसाई यांनी आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधींची तुलना उर्फी जावेदशी केली. ‘थंडीमध्ये फक्त एक टीशर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी’, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
अन् उर्फी भडकली...
भाजप नेत्याचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं.पण उर्फी ते पाहून जाम संतापली. तिने संबंधित भाजप नेत्याला सणसणीत उत्तर दिलं. ‘राहुल गांधींचं माहिती नाही, पण मी तुमच्यापेक्षा तरी नक्कीच चांगली राजकीय व्यक्ती होऊ शकते. माझ्या राज्यात एकाही महिलेचा तिच्या कपड्यांवरून अपमान केला जाणार नाही. तुमचा मुद्दा मांडण्यासाठी तुम्ही एका महिलेचा अपमान करता,अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला करायचं आहे का?,’ असं उर्फीने उत्तर देताना सुनावलं.
इन्स्टाग्रामवरही उर्फीने याबद्दलचा संताप व्यक्त केला. स्क्रीनशॉट शेअर करत आणि गुजरात भाजपाला टॅग करत ती भाजपावर चांगलीच बरसली. ‘हे तुमचे नेते आहेत का? काहीतरी चांगलं करा...असे लोक महिलांना सुरक्षा पुरवतील अशी अपेक्षा कशी करता येईल?’, असा सवाल तिने केला. सध्या उर्फीच्या या ट्वीटची जोरदार चर्चा आहे. यानिमित्ताने उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.