Urfi Javed New Song: उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. अतरंगी फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची चित्रविचित्र ड्रेसिंग स्टाईल.
होय, अतरंगी स्टाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी उर्फी प्लास्टिकचा ड्रेस घालून मिरवते. कधी सेप्टीपिन्सपासून बनवलेला ड्रेस घालून दिसते. तर कधी टॉपऐवजी नुसता साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून स्पॉट होते. अगदी पोत्यापासून बनवलेला ड्रेस घालून ती एकापेक्षा एक भारी पोझ देते. बोल्ड लुकमुळे उर्फी अनेकदा ट्रोल होते. पण उर्फीला ट्रोलिंगची पर्वा नाही. याच उर्फीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. होय, तिचं ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणं युट्यूबवर रिलीज झालं आहे आणि या गाण्यानं अक्षरश: हवा केली आहे.
या गाण्यात लाल साडीतील उर्फीचा सिजलिंग अवतार पाहायला मिळतोय. उर्फीच्या म्युझिक व्हिडीओमधील ‘हाय हाय ये मजबूरी’ या गाण्याला श्रुती राणेनं आवाज दिला आहे. हे गाणं 70 च्या दशकातील ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील ओरिजनल गाण्याचा रिमेक आहे. ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणं मनोज कुमार व जीनत अमानवर चित्रीत करण्यात आलं होतं. त्यावेळी हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. आजही हे गाणं लोकांच्या आवडीचं गाणं आहे.
‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. तिची लोकप्रियता किती? तर आता उर्फी Most Searched Asian 2022 यादीत आली आहे. ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं आहे.