बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल भाऊचा धक्का झाला. या धक्क्यावर रितेश देशमुखने काल पुन्हा एकदा सर्वांसमोर सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी रितेशने A टीममधील सदस्यांना चांगलंच सुनावलं. घमेंडी, गर्विष्ठ असं म्हणत रितेशने A टीममधील निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यावेळी वैभव चव्हाणने या आठवड्यात मालवणी भाषेबद्दल जे विधान केलं होतं, त्याविषयी रितेशने त्याला चांगलंच सुनावलं असून वैभवने या विधानाबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली.
वैभवने हात जोडून मागितली माफी
रितेश देशमुख काल भाऊचा धक्क्यावर वैभवला म्हणाला, "तुम्ही टास्क जिंकण्याच्या नादात मालवणी आणि मराठीमध्ये एक रेष ओढायचा प्रयत्न केला." यावर वैभवने हात जोडून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला, "असं काही माझ्या मनात अजिबात नाहीय. मालवणी आणि मराठी असं करण्यामध्ये माझ्या खरंच मनात काही नाही. कोणाला दुःख वाटेल असं माझ्या खरंच मनात नव्हतं. अंकिता सो सॉरी." रितेश त्याला पुढे म्हणाला, "विचार करुन बोलायला शिका. बोलून झाल्यावर विचार केला तर त्याचा काही उपयोग होत नाही."
वैभव नक्की काय म्हणाला होता?
बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात घरात दोन पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क सदस्यांना दिला होता. फक्त मराठी भाषेचा वापर करा, असा नियम बिग बॉसने दिला होता. त्यावेळी एका टीमकडून वैभव संचालक होता. दुसऱ्या टीमकडून अंकिता बाळाला खेळवत होती. तिने बाळाला खेळवताना मालवणी भाषेचा वापर केला. ही भाषा बोलली तर चालेल का हे तिने वैभवला विचारलं. पण वैभवने घरात एकच गोंधळ घातला. मालवणी ही मराठी भाषा नाही, बिग बॉसने मराठी भाषेचा वापर करायला सांगितलं आहे, असं म्हणत वैभवने अंकिताच्या टीमविषयी तक्रार फळ्यावर लिहायला घेतली.