झी मराठीवर आता ‘चंद्रविलास’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.
या मालिकेत अभिनेता वैभव मांगले याने भूताची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबाबत वैभव म्हणाला, यात नरहरपंतची भूमिका साकारत आहे. हा दोनशे वर्षांचा आत्मा आहे. हा 'चंद्रविलास' मध्ये का आहे? तो 'चंद्रविलास' मध्ये माणसांना का बोलवतो? त्याची उत्सुकता पहिल्या एपिसोडपासून दिसेल आणि त्या आत्माच्या जोडीला अजून एक भूत आहे. त्याच्याबद्दलही प्रेक्षकांना हळू हळू मालिकेतून कळत जाईल.
पुढे तो म्हणाला, मला भयपट विशेष आवडत नाही. कारण मला भयपटाची प्रचंड भीती वाटते. भयपटातील संगीताने मला प्रचंड घाबरायला होतं. दचकायला होतं. त्यामुळे मी लहानपणी भयपट पाहिलेलच नाही. तसंच मी अलिकडेच काळातही भुताचा चित्रपट पाहिलेला नाही. पण मुळात भीती ही नैसर्गिक भावना आहे. कारण माणूस घाबरला नाही तर तो जीवंत राहू शकला नसता.
वैभव मांगले म्हणाला, माझा यातील लूक वेगळा आणि खतरनाक आहे. पांढरा फिकट पडलेला तो आत्मा, त्याचे पिवळा रंगांचे डोळे हे खूपच भीतीदायक आहे. मेकअप करायला तास दीड तास लागतो.