'साराभाई वर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं २३ मे रोजी निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. वैभवी काही काळ हिमाचल प्रदेशात होती. ती होणार नवरा जय सुरेश गांधीसोबत फिरायला गेली होती. वैभवी आणि जयसोबत फॉर्च्युनर कारमध्ये होती. दोघेही तीर्थक्षेत्र बंजार खोऱ्यात फिरायला जात होते. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांच्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कार रस्त्याच्या जवळपास ५० फूट खोल दरीत कोसळली.
आता या अपघातात काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. कुल्लू एसपी साक्षी वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वैभवी कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती तसे करू शकली नाही आणि तिचा जागीच मृत्यू झाला. एसपींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे- "वैभवीला कारच्या खिडकीतून बाहेर पडायचे होते, परंतु तिच्या डोक्याला दुखापत झाली, जी प्राणघातक ठरली." त्याला बंजार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
कार भरधाव वेगात जात असल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात वैभवीचा मृत्यू झाला, मात्र तिचा जय सुरेश गांधीचा जीव वाचला. त्याला फक्त किरकोळ जखमा झाल्या आहेत. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
वैभवी उपाध्याय ‘साराभाई वर्सेस साराभाई’या मालिकेत अभिनेत्रीने जस्मिनची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. यानंतर तिने ‘क्या कुसूर है अमला का’, ‘सीआयडी’, ‘अदालत’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. वैभवीने २०२० साली दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (२०२३) या सिनेमांमध्ये काम केलं होतं. राजकुमार राव आणि टिमरी अभिनीत सिटी लाइट्स सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होत. अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील गाजलेली वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ यामध्ये वैभवीने आयुष मेहरा आणि बरखा सिंगबरोबर काम केले होते.