साराभाई वर्सेस साराभाईमध्ये जॅस्मिनची भूमिका साकारणाऱ्या वैभवी उपाध्याय(Vaibhavi Upadhyaya)च्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात तिचा मृत्यू झाला. ती फक्त ३९ वर्षांची होती. तिच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधनानंतर अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. नुकतेच तिचा होणारा नवरा जय गांधी याने त्यावेळी नेमके काय घडले? याबद्दल सांगितले.
वैभवी उपाध्याय हिच्या कार अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये झाला. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत फिरण्यासाठी गेली होती. यावेळी दुर्देवाने तिचे निधन झाले. तर तिचा होणारा पती जय गांधीला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जय गांधीने त्या अपघातावेळी काय घडले? याबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की,माझ्यावर या अपघाताचा गंभीर परिणाम झाला आहे. मी अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही. माझे हात-पाय अजूनही थरथरतात.
अफवा पसरवणे बंद करावे...तो पुढे म्हणाला की, अनेक लोकांचा समज असा असतो की जेव्हा तुम्ही रोड ट्रीप करता तेव्हा वेगाने गाडी चालवता, पण २२ मे रोजी असे काहीही घडले नव्हते. आमची गाडी एका बाजूला उभी होती. आम्ही एक ट्रक जाण्याची वाट पाहत होतो. मी आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पण एक गोष्टी नक्की की, आम्ही सीट बेल्ट लावलेला नाही, आमच्या गाडीचा वेग जास्त होता, अशा अफवा पसरवणे लोकांनी बंद करावे.
दरम्यान वैभवी उपाध्यायच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कलाविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. वैभवीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.