Join us

​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण'मध्ये वर्षा दांदळे करणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:34 AM

आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत एंट्री करत आहेत. ...

आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत एंट्री करत आहेत. श्रीधरच्या आत्याच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. त्यांच्या एंट्रीने मालिकेच्या कथानकाला एक रंजक वळण मिळणार आहे.आक्का आत्या म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. जुन्या पिढीची असूनही नव्या काळाचे तिला चांगलेच भान आहे. ती व्हॉट्सअॅप-फेसबुकही वापरते.  चित्रपटांची आवड असल्यानं मध्येच फिल्मीही होते. तिचा स्वभाव मात्र जरा चमत्कारिक आहे. चेष्टा करताना अचानक चिडते, चिडलेली असताना हसू लागते. तिच्या या विचित्र स्वभावामुळे ती खाष्ट वाटते. ही आक्का आत्या काही ना काही करून रेवतीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. श्रीधरला रेवतीबद्दल काहीबाही सांगून चिथवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आक्का आत्याच्या कारस्थानांना श्रीधर बधत नाही; उलट तो रेवतीलाच पाठिंबा देतो.  श्रीधर आणि छोटी मालकीण रेवती यांच्या नात्यात आक्का आत्या मीठाचा खडा टाकू पाहत आहे. आक्का आत्याच्या एंट्रीने कथानक अधिक रंजक होणार आहे. आक्का आत्याची कारस्थाने श्रीधर कशी उधळून लावणार हे पाहणं उत्सुकतेचे असेल. छोटी मालकीण ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेची कथा, व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच आवडत आहेत. या मालिकेत अक्षर कोठारी प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहे तर एतशा संझगिरी या मालिकेत छोटी मालकीण ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचसोबत या मालिकेचे शीर्षक गीत देखील लोकांनी खूपच आवडत आहे.  रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचे चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नाते सांगणारे शब्द असा उत्तम योग्य जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे. 'वाऱ्यावर पसरले सूर मखमली, मनामंदी झुलली माझ्या तुझी सावली, रानोवनी पानोपानी प्रीत जागली, नजरेला जेव्हा तुझ्या नजर भेटली' असे रोमँटिक शब्द असलेले हे शीर्षक गीत आहे. या गाण्यातून छोटी मालकीण रेवती आणि श्रीधर यांच्यातली केमिस्ट्रीही दिसून येते. त्यांच्या अव्यक्त नात्याविषयीही हे गाणे खूप काही सांगून जाते. नव्या दमाचे गीतकार वैभव देशमुख यांच्या शब्दांना संगीतकार देवेंद्र भोमेने संगीतबद्ध केले आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने त्याच्या खास शैलीत हे गाणे गायले आहे. Also Read : नोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली 'छोटी मालकीण'