Join us

लेक असावी तर अशी! वर्षा दांदळेंच्या तब्येतीत होतेय सुधारणा, लेकीच्या वाढदिवसानिमित्त लिहिली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:58 PM

मागील महिन्यात २२ सप्टेंबरला वर्षा दांदळे यांचा गंभीर अपघात झाला आणि त्यात त्यांच्या पाठीच्या मणक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री वर्षा दांदळे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील महिन्यात २२ सप्टेंबरला त्यांचा गंभीर अपघात झाला आणि त्यात त्यांच्या पाठीच्या मणक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. हे वृत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी या बातमीची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी नाशिकला पाठवले होते. अपघात झाल्यानंतर त्यांना कुठलीच हालचाल करणे शक्य नव्हते. आज जवळपास एक महिन्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसते आहे. या कठीण काळात त्यांची मुलगी तन्मयीने त्यांना खूप मोठी साथ दिली. त्यामुळे तिच्या वाढदिवसानिमित्त वर्षा दांदळे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

वर्षा दांदळे यांनी इंस्टाग्रामवर लेकीसोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, हॅप्पी बर्थडे डिअर डॉटर तन्मयी. २२ सप्टेंबरला अपघात झाल्यावर हॉस्पिटल्स, सर्जन्स, सर्जन कडुन होणाऱ्या ऑपेरेशन्सचीं माहिती, आणि ऑपेरेशन झाल्यावर कराव्या लागणाऱ्या फिजिओथेरेपीची सर्व जबाबदारी एकहाती सांभाळणारी माझी लेक आज एक महिन्यानंतर मला आता टाईप ही करता येते आहे .. यावरून तिच्यातल्या फिजिओथेरेपीस्टचे महत्व लक्षात आले असेलच..हॅप्पी बर्थडे तनू. जशी आहेस तशीच रहा सेवाभावी.

 १९९९ साली वर्षा दांदळे यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्या झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी आत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली होती. पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ आणि मलवणी डेज मधली मालवणी काकू अशा त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या.