‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे आणि बिग बॉसच्याच घरात त्याच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री वीणा जगताप यांच्या ब्रेकअपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. पण कदाचित शिव आणि वीणाच्या ब्रेकअपच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. होय, होळीच्या निमित्ताने शिव आणि वीणाने शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टवरून तरी हेच म्हणायला हवे.
होय, होळी साजरी करतानाचा एक व्हिडीओ शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात शिवसोबत अनेक जण आहेत. अर्थात चेह-यावर मास्क असल्याने शिवसोबत कोण हे ओळखता येत नाही. दुसरीकडे वीणा हिनेही चेह-यावर मास्क घातलेला व्हिडीओ शेअर केला आहे. शिवने जसा मास्क घातलाये, अगदी वीणानेही सेम टू सेम मास्क घातला आहे.
साहजिकच वीणा व शिवने एकत्र होळी साजरा केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिव व वीणाच्या ब्रेकअपच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे मानले जात आहे. शिव व वीणाचे नाते बिग बॉसच्या घरातच फुलले होते. बिग बॉसच्या घरात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तर चांगलेच बहरले. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत फोटो व व्हिडीओ शेअर करण्याचा अक्षरश: धडाका लावला होता.
पण गेल्या काही दिवसांत वीणा किंवा शिव दोघांच्याही इन्स्टा अकाऊंट एकमेकांचा उल्लेखही दिसला नाही. यामुळेच दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. शिवने यावर थेट बोलणे टाळले होते. आम्ही सध्या आमच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ येईल त्यावेळी लग्नाचा निर्णय घेऊन लग्नबंधनात अडकायला आवडेल, असे तो म्हणाला होता.वीणा सध्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत बिझी आहे तर शिवही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे.