Join us

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील ‘भावे’ काळाच्या पडद्याआड, अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:31 AM

Hemant Joshi passed away : एक दिलखुलास अभिनेता हरपला, मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा 

ठळक मुद्देहेमंत जोशी यांनी  मालिका, चित्रपटांसह अनेक नाटकांमध्ये काम केले होते. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘टेंडल्या’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक सिनेमांत ते दिसले. 

कोरोनाने अनेकांचा बळी घेतला़ अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं. कोरोना बळींचं हे दृष्टचक्र अद्यापही थांबण्याची चिन्हं नाहीत. ‘जीव झाला येडापिसा’ ( Jeev Zala Yedapisa) या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी (Hemant Joshi passed away) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले.  हेमंत जोशींच्या निधनावर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. 19 मे ला हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेत ‘भावे’ ही भूमिका साकारली होती. हेमंत जोशी हे अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे.अभिनेत्री सुमेधा दातार आणि अभिनेता सुप्रीत निकम यांनी हेमंत जोशींच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘जीव झाला येडा पिसा’मध्ये  विजया काकी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहायला मनच धजत नाहीये. दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटी़ सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व. कसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच ‘ऐश’... माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास...आणि काल अचानक भावे गेले ... किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत ‘ऐश’ करा...,’ अशी पोस्ट सुमेधाने शेअर केली आहे.

अभिनेता सुप्रीत निकम यानेही त्यांच्या निधनावर भावुक पोस्ट लिहिली आहे. ‘आज तुमच्या रूपाने मी माझा एक मित्र गमावला आहे. कारण वडीलधारी असूनही तुम्ही जवळच्या मित्रानपेक्षा कमी नव्हता. काका, तुम्ही नेहमी तक्रार करायचात की मी फोन करत नाही, आता कुणाला फोन करू,’ असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.हेमंत जोशी यांनी  मालिका, चित्रपटांसह अनेक नाटकांमध्ये काम केले होते. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘टेंडल्या’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक सिनेमांत ते दिसले.  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते.

टॅग्स :जीव झाला येडापिसा