'बिग बॉस १७' मुळे अंकिता लोखंडेचा पती विकी जैन चर्चेत आला. पहिल्या दिवसापासूनच विकी जैनने 'बिग बॉस'च्या घरात जम बसवायला सुरुवात केली होती. पण, फिनालेआधीच त्याला घरातून बाहेर पडावं लागलं. 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर विकी ईशा मालवीय, सना खान आणि आयशा खानबरोबर पार्टी करताना दिसून आला. या पार्टीमधलाच विकीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पुर्वा राणासोबतच्या विकीच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'बिग बॉस'च्या घरात अंकिता आणि विकीचे छोट्या छोट्या कारणांवरुन वाद होताना दिसायचे. अनेकदा अंकिता आणि विकीमधील वाद घटस्फोटाच्या चर्चांपर्यंतही पोहोचला होता. 'बिग बॉस'च्या घरातील विकीची इतर मुलींबरोबरची जवळीक अंकिताला खटकायची. पण, 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही विकी मुलींच्या घोळक्यातच दिसून आला. इन्फ्लुएन्सरसोबतच्या फोटोमुळे पुन्हा विकी चर्चेत आला आहे.
पूर्वा राणाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन विकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विकी राणाबरोबर पोझ देताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहते अवाक् झाले आहेत. या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. "ज्याची भीती होती तेच झालं अंकिता", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "आणि याच्या आईला वाटतं माझा मुलगा काहीच करत नाही", असं म्हटलं आहे. "अंकिता लोखंडे बिग बॉस १७मध्ये रडत असेल", अशी कमेंटही केली आहे. "म्हणून अंकिता नेहमी चिंतेत असते," असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट पाहून पूर्वा राणानेही या फोटोवर कमेंट केली आहे. "एवढा द्वेष का? माझे दोन्ही बेस्ट फ्रेंड आनंदी आहेत. ते एकत्र आहेत. ड्रामा करण्याचा प्रयत्न करू नका...काही मिळणार नाही यातून", असं म्हणत पूर्वाने हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत. दरम्यान, 'बिग बॉस'च्या टॉप ५मध्ये अंकिताने स्थान मिळवलं आहे. रविवारी(२८ जानेवारी) 'बिग बॉस १७'चं फिनाले पार पडणार आहे. आता सगळ्यांची लाडकी अंकिता लोखंडे बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.