'आई कुठे काय करते' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रुपालीचं मोठं स्वप्न पूर्ण झालं असून तिने ठाण्यात स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. 29 जून रोजी तिने नवीन घराची वास्तुशांती केली. यावेळी मालिकेतील सहकलाकार आणि इंडस्ट्रीतील मित्रमंडळीही आली होती. रुपालीने तिच्या स्टाईलने हे घर सजवलं आहे.
रुपालीची अत्यंत जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिचा आनंद व्यक्त केला आहे. रुपालीने केलेली मेहनत आणि तिचं नवीन घर याबाबत लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गौरी भावुक झाली. "रुपाली माझी मैत्रीण आहे ही गोष्ट आता सर्वांना माहिती आहे. खरं सांगायचं तर ती माझं कुटुंब आहे. तिने नवीन घर घेतलंय याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरंतर मला बोलताही येत नाही एवढी मी आनंदी आहे."
"मी माझ्या कुटुंबीयांपासून दूर राहते. अशा परिस्थितीत रुपालीने मला तिच्या कुटुंबाचा एक भाग करून घेतलं. घर घेतलं ही बातमी तिने मला भेटून सांगितली होती. आम्ही आनंदनगर परिसरात भेटलो. कारमध्ये बसलो होतो. त्यावेळी तिने अचानक मला पेढा खाऊ घातला. मी विचारलं की काय झालं? तेव्हा ती म्हणाली की, मी फायनली घर घेतलं. त्यावेळी आम्ही दोघीच होतो गाडीत आणि आम्ही दोघी क्रेझी रडत होतो. नेमकं काय चाललं आहे हे कळत नव्हतं."
"मी तिच्यासाठी खूप जास्त आनंदी आहे आणि मला तिचा खूप जास्त अभिमान वाटतो आहे. अगदी पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज खूप मेहनतीने आणि कष्ट करून इथपर्यंत आली आहे आहे. या नव्या घरामुळे मला वाटतंय अरे आपलंच नवीन घर झालं आहे. आता तिच्यामुळे माझं मुंबईमध्ये एक हक्काचं घर आहे जिथे मला जाता येईल. मला आता बीडला जावं लागणार नाही."
"नव्या घराची गोष्ट समजल्यावर आम्ही एकमेकींशी काहीच बोललो नाही. फक्त रडत होतो. या घराचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून प्रत्येक गोष्टीचं अपडेट ती मला देत होती, मी हे लाईट्स लावणार आहे, मी हे करणार आहे आणि आपल्या घरात आपण हे करत आहोत अशीच तिची भाषा असायची. माणूस म्हणून रुपाली खूपच भारी आहे. मी तिची मैत्रीण आहे हे माझं खूप मोठं भाग्य आहे" असं गौरी कुलकर्णीने म्हटलं आहे.