स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच दाखल झालेली शशांक केतकरची नवीन मालिका 'मुरांबा'चे दिग्दर्शन विघ्नेश कांबळे करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'कुसुम', 'हंड्रेड डेज', 'आई माझी काळूबाई', 'गोठ', ग्रहण, स्पेशल ५, कळत नकळत' या मराठी मालिकांचे तर 'अल्लादीन', 'थपकी प्यार की', 'अर्जुन', 'सुहानी सी लडकी', डिटेक्टिव्ह देव या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. विघ्नेश कांबळे यांनी हिंदी टेलिव्हिजनवरील वेगवेगळे प्रयोग मराठी मालिकेतही घडवून आणले आहेत. यातील एक प्रयोग म्हणजे अंडरवॉटर शूट. त्यांनी 'गोठ' या मालिकेत अंडरवॉटर शूटचा प्रयोग केला होता आणि तो यशस्वीदेखील झाला होता. या शूटची मराठी टेलिव्हिजनवर खूप चर्चादेखील झाली होती. विघ्नेश कांबळे यांनी मराठी टेलिव्हिजनवर अंडरवॉटर शूट करण्याच्या या प्रयोगाबद्दल सांगितले की, 'अंडरवॉटर शूट करणं हे त्या संहितेची गरज होती. ते एक दिवसाचे अंडर वॉटर शूट होते. या एका दिवसाच्या शूटचा खर्च जवळपास ८ ते ९ लाख रुपये होता. त्यादिवशी मी फक्त आठच शॉट घेतले होते. असे मराठी मालिकेत कधीच घडत नाही. ज्याप्रमाणे चित्रपटासाठी अंडरवॉटर शूट करतात. त्याप्रमाणेच हे शूट पार पडले. हा एक वेगळा प्रयोग होता. मराठी टेलिव्हिजनमध्ये हे पहिल्यांदाच झाले होते. हिंदीत मी २०१३-१४ साली स्टार प्लसच्या 'अर्जुन' मालिकेसाठी पहिल्यांदा अंडरवॉटर शूट केले होते. त्यावेळी मला असा प्रयोग मराठी मालिकेत व्हायला पाहिजे असे वाटत होते. स्क्रीप्टनुसार मला 'गोठ'मध्ये अंडर वॉटर शूट करण्याची संधी मिळाली. मी ते वाहिनी आणि निर्मात्यांशी चर्चा करून हे शूट घडवून आणले. त्यानंतर त्याचा प्रोमोदेखील चॅनेलने खूप चालवला आणि त्याची सगळीकडे खूप चर्चादेखील झाली.
'मुरांबा' मालिकेबद्दल सांगताना विघ्नेश म्हणाले की, 'मुरांबा' मालिकेत त्रिकोणी लव्हस्टोरीसोबत दोन मैत्रिणींची घट्ट मैत्रीदेखील अधोरेखित केली आहे. त्या दोन्ही मैत्रिणींमध्ये आर्थिक दरी आहे. रमा ही सामान्य कुटुंबातील आहे जिला फक्त आई आणि मावशी आहे. आईला कॅन्सर होतो. त्यामुळे तिला आठवी इयत्तेत शिक्षण सोडावे लागते आणि तेव्हापासून रमा अल्पोपहार व्यवसायात आईला मदत करते. तर रेवा ही श्रीमंत घरातील आहे. दोघींमध्ये आर्थिक तफावत असली तरी त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्या दोघी एकमेकींसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र रमाला जो मुलगा आवडतो. त्या मुलाला रेवा आवडत असते. मग यामुळे त्यांच्या मैत्रीवर काही परिणाम होतो का, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या मालिकेत रेवाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निशानी बोरूले हिने साकारली आहे. तिने यापूर्वी काम केलेले आहे. मात्र रमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिची ही पहिलीच मालिका आहे. ती सोशल मीडिया स्टार असून तिथे तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. जेव्हा माझ्याकडे तिची ऑ़डिशन आली तेव्हा आपण फ्रेशर्संना का घेतोय असा प्रश्न माझ्या मनात आला. पण जेव्हा मी तिला भेटलो आणि तिच्याशी बोललो तेव्हा मला त्या भूमिकेसाठी तिच योग्य वाटली. कारण जेव्हा आपण नवीन लोकांसोबत काम करतो तेव्हा तो मातीचा गोळा असतो ज्याला आकार देऊ तसा तो घडत जातो. मला अशा लोकांसोबत काम करायला आवडते कारण मला त्यांना घडविता येते, असे विघ्नेश कांबळे म्हणाले.