Join us

'पिंकीचा विजय असो' मालिकेत युवराजच्या भूमिकेत दिसणार अभिनेता विजय आंदळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 2:13 PM

विजयला ( Vijay Andalkar ) याआधी बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षक भेटले आहेत. 'गोठ' या मालिकेत त्याने खलनायक साकारला होता.

छोट्या पडद्यावर लवकरच भेटीला येणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’( Pinki Cha Vijay Aso) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोंना देखील भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत युवराज ही व्यक्तिरेखा साकरणार आहे अभिनेता विजय आंदळकर (Vijay Andalkar). विजयला याआधी बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षक भेटले आहेत. 'गोठ' या मालिकेत त्याने खलनायक साकारला होता.

पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज साकारण्यासाठी तो खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना विजय म्हणाला, ‘राजकारणातील मोठं प्रस्थ असणाऱ्या गजराज धोंडे पाटील यांचा युवराज हा मुलगा. वडिलोपार्जित सत्ता-संपत्ती यामुळे रॉयल कारभार असलेला. आपल्याला फक्त मान पाहिजे, जान गेली तरी चालेल हे युवराजचं ब्रीदवाक्य आहे. मान मिळवण्यासाठी युवराज काहीही करु शकतो. 

मालिकांमध्ये राजकारण हा विषय फार क्वचित हाताळला जातो. त्यामुळे पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. सातारी भाषा शिकण्यासाठी मी बरीच मेहनत घेतोय. माझ्या सातारच्या मित्रांना मी आवर्जून फोन करतो आणि सातारी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. आमचं शूट साताऱ्यामध्ये सुरु असल्यामुळे आजुबाजूच्या दुकानदारांशीही बोलीभाषेत बोलतो. 

या भाषेत एक वेगळाच गोडवा आहे. साताऱ्यातलं वातावरण अतिशय सुंदर आहे. डोंगर दऱ्यांमध्ये आम्ही शूट करतोय. इथे कायमस्वरुपी रहाणारी लोकं नशिबवान आहेत असं मला वाटतं. शुद्ध हवा, घरगुती जेवण यामुळे मी शूटिंगचा मनापासून आनंद लुटतोय. तर अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार आहे.आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल.

 खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचं अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.पिंकी साकारणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. पिंकीची बोलण्याची स्टाईल माझ्या इतकी अंगवळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्तही मी इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते असेही तिने सांगितले.