'तेनालीरामा' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मुल्ला नसरुद्दीन शाहने समोर ठेवलेली आव्हाने रामाने पेलून दाखवल्यानंतर लगेचच एका रहस्यमय ढोलवाल्याच्या प्रवेशामुळे त्याच्यावर आणखी एक काम येऊन पडले आहे.
सिद्धेसन नावाच्या एका वैशिष्ट्यपूर्ण ढोलवाल्याच्या प्रवेशामुळे विजयनगर लवकरच उजळून निघणार आहे. ही भूमिका साकारत आहे विजय बदलानी. आपला दुसरा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी प्रचंड तणावाखाली असलेल्या रामाला या नव्याने प्रवेश केलेल्या अनाकलनीय व्यक्तीने आव्हान दिले आहे. ढोलाच्या पृष्ठभागाला स्पर्शही न करता तो वाजवण्याची काहीशी गूढ क्षमता या ढोलवाल्यामध्ये आहे आणि रामालाही त्याने तसेच करून दाखवण्यासाठी आव्हान दिले आहे. यामागे काय मोठे रहस्य आहे याचा पत्ता न लागल्यामुळे राम ढोलवाल्याचा सेवक होण्यापासून वाचण्यासाठी तपास करण्यास सज्ज झाला आहे. तो जेव्हा तपास करतो, तेव्हा काही विचित्र आणि धक्कादायक बाबी समोर येतात.
या बाबी उघड झाल्यामुळे परिस्थिती रामाला अनुकूल होते की, त्याच्या विरुद्ध जाते हे रसिकांनी शोधून काढायचे आहे. या अनुभवाबद्दल विजय बदलानी म्हणाला, “तेनालीरामच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे, कारण, येथे सर्वजण खूपच प्रतिभावान व सहाय्यक आहेत. या विचित्र ढोलवाल्याची भूमिका करणे हा एक उत्तम अनुभव होता आणि काही मजेदार बाबी उघड होणार असल्याने प्रेक्षक या भागांची मजा नक्कीच लुटतील.”
रामाची भूमिका करणारा कृष्णा भारद्वाज म्हणाला, “रामावर त्याचे ग्रंथ पूर्ण करण्यासाठी खूप ताण आहे आणि याचवेळी हा ढोलवाला वाजवतो तसा ढोल वाजवण्याचे आव्हान त्याला दिले गेले आहे. हे आव्हान पेलू न शकल्यास रामाला या ढोलवाल्याचा सेवक व्हावे लागणार आहे. त्यामुळे तो ढोलला स्पर्श न करता तो वाजवण्याच्या या प्रतिभेमागील रहस्य शोधून काढण्यात गुंतला आहे. आता रामापुढे कोणते आव्हान समोर येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.”