Join us

विक्रम बेताल की रहस्यगाथा ही मालिका या तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 3:12 PM

शक्ती आणि युक्ती, बुद्धी व बळ यांच्यातील हा अटीतटीचा संघर्ष सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करणार असून अहम शर्मा हा न्यायी राजा विक्रमादित्याच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर मकरंद देशपांडे चलाख चतुर वेताळाच्या भूमिकेत आहे.

 

राजा विक्रम याच्या जादुई आणि रहस्यमयी गोष्टी आणि थक्क करून सोडणारे पिशाच्च वेताळ यांनी अनेक वर्षांपूर्वी प्रेक्षकांना जादुई दुनियेची सफर घडवून आणली होती. आता &TV वर ही अतुलनीय कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विक्रम बेताल असे या मालिकेचे नाव असून सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील चढाओढीचा परिपाक या मालिकेत दाखवला जाणार आहे. शक्ती आणि युक्ती, बुद्धी व बळ यांच्यातील हा अटीतटीचा संघर्ष सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करणार असून अहम शर्मा हा न्यायी राजा विक्रमादित्याच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर मकरंद देशपांडे चलाख चतुर वेताळाच्या भूमिकेत आहे. अभिनेता सूरज थापर शक्तिशाली भद्रकालची भूमिका निभावणार आहे. या मालिकेने लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांची मांदियाळी रचली असून त्यामध्ये इशिता गांगुली, अमित बहल, सोनिया सिंग आदी कलाकारांचा यात समावेश आहे.

मुक्तपणे झाडाला लटकणाऱ्या पिशाच्चाला पकडून आपल्या बखोटीला बांधण्याचे राजा विक्रम याचे अनेक निष्फळ प्रयत्न अतिशय कलात्मकरित्या चितारणारी 'विक्रम बेताल की रहस्यगाथा' ही मालिका सुष्ट आणि दुष्ट, योग्य आणि अयोग्य, चूक आणि बरोबर यांच्यातून निवड करताना राजा विक्रमाला सामोरे जावे लागलेल्या विविध आव्हानांचे दर्शन घडविणार आहे. अतिशय नेत्रदीपक रेखाटन आणि सादरीकरण यांच्याद्वारे ही मालिका बेताल व भद्रकाल यांच्यातील फारशी परिचित नसलेली कथा आणि त्यांच्या परस्परविरोधी व्यक्तित्व तसेच आदर्शांमधील संघर्ष प्रेक्षकांसमोर आणणार आहे. प्रत्येक पात्राला एक अतिशय जबरदस्त आकर्षक आणि सक्षम वलय असून त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांना विक्रम, वेताळ व भद्रकाल या तिघांच्या परस्परविरोधी दुनियांची सफर घडविणार असून प्रत्येक भागाच्या अखेरीस आयुष्याशी निगडित एक अत्यंत मोलाची शिकवण, एक चातुर्याचा धडा देखील देऊन जाणार आहे. 

तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा टेलिव्हिजनच्या पडद्याकडे वाळलेले मकरंद देशपांडे यांनी वेताळाचे पात्र अधिक खुलवून सांगितले. ते म्हणाले, “विक्रम बेताल की रहस्य गाथा' मालिकेत वेताळाचे पात्र रंगविण्यासाठी मी आतुर झालो आहे. वेताळ हे एक चतुर, चलाख आणि कनवाळू पिशाच्च आहे, ज्याला आपल्या कुवतीनुसार मानवांची मदत करण्याची इच्छा आहे. कोड्यांच्या माध्यमातून अतिशय चलाखीने आणि हुशारीने महान राजा विक्रमादित्यासमोर आव्हाने फेकण्याच्या त्याच्या पद्धतीमधून या पिशाच्चाची कुशाग्र आणि मनमोकळी बाजू सामोरी येते. आमच्या मालिकेतील वेताळ अतिशय दिलखुलास आणि मैत्रीपूर्ण भूत आहे, जो हवेत लटकत असतो आणि धुरकट दिसतो. त्याच्या पायाच्या जागी एक मजेदार वळणदार शेपूट असून ती राजा विक्रमादित्याच्या कंबरेभोवती गुंडाळली जाते. हे पात्र प्रेक्षकांना निश्चितपणे आवडणार असून ही विक्रम आणि वेताळ यांच्या पूर्वीच्या कथांसारखीच नवीन निर्मिती खरोखर जादू घडवून आणेल अशी मला आशा आहे.”

विक्रम बेताल ही उत्कंठावर्धक मालिका येत्या १६ ऑक्टोबर २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वाजता &TV वर प्रक्षेपित होणार आहे.