Join us

"या मागे नक्की कुणाचा हात...", विनेश फोगाटसाठी समीर परांजपेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:43 AM

एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटवर सक्रिय असलेल्या विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते.

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat)  १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. या घटनेमुळे भारताचं स्पर्धेतील एक हक्काचं पदक हुकल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विनेशसाठी अनेकांनी पोस्ट करत तिला पाठिंबा दिला आहे. अभिनेता समीर परांजपे याने देखील पोस्ट केली आहे. 

समीरने पोस्टमध्ये लिहलं, "प्रिय विनेश, होय आता "प्रिय" लिहिणारच... वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं आहेस अग, ट्रेंडिग आहेस तू. "धाकड हैं धाकड हैं" ऐकू येतंय जिथे तिथे. १०० ग्रॅमने ते मेडल हुकलं आहे, पण ठीक आहे. आता येत्या विकेंडला "बसून" चर्चा करून ठरवू आम्ही, नक्की काय झालं ते. म्हणजे सगळया शक्यता तपासू, या मागे नक्की कुणाचा हात होता हे शोधून काढूच आम्ही. मग त्याच्या नावाने शंख करू सोशल मीडियावर. तू काळजीच करू नकोस. ज्याप्रमाणे तुला रस्त्यावरुन फरफटत नेताना आम्ही शंख केला होता, तसाच पुन्हा करू. बोललो होतो, खेळ सोडून हिला आता हिरो बनायची काय हौस आहे? पॉलिटिक्स आहे रे सगळं... नाटकं आहेत सगळी... करियर संपणार बघ हीचं"

पुढे तो म्हणतो, "कौतुक किंवा सांत्वन वैगरे काही करणार नाही, कारण त्या कशाचीच तुला गरज नाहीये. तु अजेय आहेस. पण एक नक्की, जेव्हा कधी प्रतिकूल परिस्थितीतही संकटाच्या छाताडावर उभं राहणं म्हणजे काय, हे कोणाला सांगायची वेळ येईल ना तेव्हा फक्त तुझा हा फोटो दाखवेन मी समोरच्याला. Happy ending नसणारे, वेगळ्याच ट्वीस्टने संपणारे हॉलिवूड सिनेमे बघत बॉलिवूडच्या Happy ending सिनेमांना शिव्या घालणारे आम्ही आज मात्र हॅप्पी एन्डिंग होवो यासाठी प्रार्थना करत होतो. पण बहुदा नियतीलाही हे माहिती असावं की हा 'The End' नाहीये, असता कामा नये... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त", या शब्दात त्याने तिचं कौतुक करत पाठिंबा दर्शवला. 

दरम्यान, विनेशने गेल्या वर्षी कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण यांच्यावर आरोप करण्यात आला होता की, त्यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केलं आहे. कुस्तीपटूंनी या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन आणि निदर्शनं केली होती. या आंदोलनात विनेशचाही सहभाग होता. त्यावेळी तिने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. याच घटनांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत समीर परांजपे ही पोस्ट लिहली.  

टॅग्स :विनेश फोगटकुस्तीस्टार प्रवाहपॅरिस ऑलिम्पिक २०२४