स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारते आहे. अश्विनीने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली आहे. कोरोनाच्या संकटातही तिने अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नुकतीच अश्विनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. जी वाचून तुम्ही तिचे कौतुक कराल.
अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर घरोघरी जाणाऱ्या डब्यांच्या पिशव्यांचा फोटो शेअर करत कोरोनाच्या संकटात घरोघरी जेवण पोहचवणाऱ्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानमधील टीमचे कौतूक केले आहे. तिने म्हटले की, आजाराचा बाजार करून कमवणारे एकीकडे व हे पुण्य कमवणारे एकीकडे. या बाजारातून कमावलेली हरामची कमाई एक दिवस नक्की संपेल पण या कठीण काळात कमावलेले हे पुण्य आयुष्यभर सोबत उर्जा देत राहील व कुठेच कमी पडू देणार नाही.
रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये, यासाठी अश्विनी महांगडे आणि रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. खरेच अश्विनीच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.