Join us

"शिकायला परदेशी गेलायस...", विशाखा सुभेदार यांची लेकाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:25 IST

विशाखा यांनी मुलगा अभिनय सुभेदार याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे . यासोबतच त्या एक उत्तम कॉमेडीयन म्हणूनही ओळखल्या जातात. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. विविध विषयांवर आधारित पोस्ट त्या इन्स्टाग्रामवर करतात. आता विशाखा यांनी मुलगा अभिनय सुभेदार याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

विशाखा यांचा मुलगा अभिनय सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. अभिनयचा आज वाढदिवस आहे. लाडक्या लेकाचा वाढदिवसानिमित्त विशाखा यांनी दोन पोस्ट लिहिल्या आहेत. विशाखा यांनी पहिल्या पोस्टमध्ये 'शुभविवाह' मालिकेच्या सेटवरील अभिनयचा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "जेव्हा आपण एकत्र 'शुभविवाह'च्या सेटवर काम करायचो. तेव्हा हा व्हिडीओ मी गुपचूप केला होता. मला वाटलं होतं की कामाच्या ठिकाणी फोनवर होतास तू. नंतर तू मला दाखवलं. प्रॉपर्टी काढत होतास ते. बऱ्याचदा असंच होतं की मला वाटतं की पोरगं टंगळ मंगळ करतंय. पण तू फोकस राहून काम करत होतास. तू जेव्हा कामात असतोस तेव्हा १०० टक्के कामात आणि आरामात असतोस तेव्हा १०० टक्के आरामात. हे असं राहणं खूप अवघड असतं खरंतर. पण तुमच्या पिढीला जमत बाई हे असं चिल राहणं आणि तरीही ऑन ऑफ बटण कधी वापरायचं हे देखील तुला माहित आहे". 

पुढे त्यांनी लिहलं, "मुळातच खूप बॅलेंस असलेला आहेस तू. असाच राहा... खूप मोठा हो...आणि जे शिकायला परदेशी गेलायस ते सगळं शिक्षण पूर्ण करून, छान अनुभवाने मोठा होऊन ये. देव तुला जे जे हवं ते ते देवो... हेच देवाकडे आईचं मागणं अभिनय सुभेदार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... खूप खूप प्रेम अबुली". विशाखा यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये अभिनय परदेशी जातानाचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्यांनी लिहलं,  "हॅप्पी बर्थडे अभिनय सुभेदार... जे जे तुला हवं ते ते ईश्वर तुला देवो... परदेशी तुझं स्वामी रक्षण करोत.... दत्त म्हणून नेमका सज्जन माणूस तुझ्या पुढ्यात उभा राहो... आईसाहेब वणीस्थानी राहून तुझ्यावर लक्ष ठेवून आहेतच.... आणि या आईकडून तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम". त्यांच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 

टॅग्स :मराठी अभिनेता