उत्तम अभिनय आणि अपार मेहनतीच्या जोरावर विशाखा सुभेदारने मराठी मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या विशाखाने अचूक टायमिंग साधत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सह अनेक विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अनेकदा स्वत:च्याच जाडपणावर विनोद करत विशाखाने प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं. विनोदी अभिनयाबरोबरच तिने मालिका आणि सिनेमांतून विविधांगी भूमिकाही साकारल्या. पण, या जाडपणामुळे अनेक चांगल्या भूमिका हातातून गेल्याची खंत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने व्यक्त केली आहे.
विशाखाने या मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील करिअर, वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीत विशाखाने तिच्या जाडपणावरही भाष्य केलं. “लग्न झालंय किंवा बाळ आहे म्हणून भूमिका नाकारल्या गेल्या असं कधी झालंय का?” असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला. यावर उत्तर देत विशाखा सुभेदार म्हणाली, “लग्न झालंय किंवा बाळ आहे म्हणून नाही पण माझ्या जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या. आपली तशी फिगर नाही म्हणून ही भूमिका मिळाली नाही, याची खंत वाटते.”
“मला सई, अमृता, प्रिया बापट या सगळ्या मुलींचं कौतुक वाटतं. त्या ज्या पद्धतीने स्वत:ला मेंन्टेन ठेवतात. भूमिकेनुसार त्या वजन वाढवतात किंवा बारीक होतात. स्वत:च्या शरीरावर सातत्याने काम करत नाही, हे सोपं नाही. हे मला जमत नाही. याची खंत नक्कीच वाटते. पण, माझ्या पद्धतीच्या भूमिका त्यादेखील करू शकत नाही. माझ्या पद्धतीचे रोल मीच करू शकते,” असंही पुढे विशाखा म्हणाली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून विशाखा चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करायची. आजही हास्यजत्रेत चाहते तिला मिस करतात. विशाखाने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. ‘कुर्रर्र’ या नाटकाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. सध्या विशाखा स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.