बॉलिवूडचे स्टार्स अनेकदा ट्रोल होतात. आता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल ददलानी असाच ट्रोल होतोय. ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर विशालने ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याबद्दल चुकीची माहिती पुरवली आणि विशाल ट्रोल झाला. मग काय, नेटक-यांनी चूक लक्षात आणून दिल्यावर त्याला माफी मागावी लागली. विशाल ददलानी ‘इंडियन आयडल 12’ हा शो जज करतोय. काल रविवारच्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गीत सादर केले. त्यावेळी गाण्याचे कौतुक करत विशालने चुकीची माहिती दिली.
लता मंगेशकर यांनी हे गाणे 1947 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायले होते, असे त्याने सांगितले. पण नेटक-यांनी त्याची ही चूक नेमकी पकडली. माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनीही विशालवर टीका केली.
‘हे आहेत म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानी. इतिहास, संगीत आणि भारतरत्न व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांबद्दल इतके अज्ञान...,’ असे त्यांनी लिहिले. केवळ इतकेच नाही तर ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याचा संपूर्ण इतिहासही त्यांनी दिला. ‘लता मंगेशकर यांनी ऐ मेरे वतन के लोगों हे गीत 26 जानेवारी 1963 रोजी दिल्लीत गायले होते. हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिले होते. गीत ऐकल्यानंतर पंडित नेहरू कमालीचे भावूक झाले होते. लता बेटी, तुझ्या गाण्याने मला अक्षरश: रडवले, असे ते भावूक होऊन म्हणाले होते,’ अशी माहिती त्यांनी पुरवली.
काही नेटक-यांनीही विशाल ददलानीला ट्रोल केले. काहींनी तर चक्क सोनी टीव्हीला सल्ला देत, अशा माणसाला आपल्या शोमधून काढून टाका, असे लिहिले.
विशालने मागितली माफी
या सर्व प्रकरणावर आता विशाल दादलानी यांनी दिलगीरी व्यक्त करत सर्वांची माफी मागितली आहे. ‘ऐ मेरे वतन के लोगों’बद्दल मी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे नाराज झालेल्या लोकांची मी माफी मागतो,’ असे त्याने लिहिले.