Join us

विशाल निकमची नवी मालिका 'येड लागलं प्रेमाचं', दिसणार हटके अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:55 IST

Vishal Nikam : 'येड लागलं प्रेमाचं' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून विशाल निकम हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून विशाल निकम (Vishal Nikam) हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. याआधी दख्खनचा राजा जोतिबा आणि साता जल्माच्या गाठी या स्टार प्रवाहच्या मालिकेतून विशालचा निराळा अंदाज प्रेक्षकांनी पाहिला आहे. येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या निमित्ताने विशाल निकमने आपल्या भूमिकेचं वेगळेपण सांगितलं.

येड लागलं प्रेमाचं या मालिकेत विशाल निकम रायाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेबद्दल तो म्हणाला की, आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. फणसासारखा वरवर काटेरी आणि कठोर वाटणारा राया आतून मात्र इमोशनल आहे. अनाथ मुलं आणि आजारी लोकांबद्दल त्याला विशेष आस्था आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या आईला गमावलं. त्यामुळे स्त्रियांना तो मान देतो. कुठेतरी त्याच्याही नकळत तो आईचं प्रेम शोधतो आहे. रायाला खोटं बोलणं सहन होत नाही. कितीही वाईट असलं, कटू असलं तरी खरंच बोलायचं असं त्याचं मत आहे. रायाची विठ्ठलावर प्रचंड श्रद्धा आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखील पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.

या मालिकेच्या निमित्ताने विशाल अभिनेत्री पूजा बिरारीसोबत दिसणार आहे. याबद्दल त्याने सांगितले की, पूजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. ती खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असे मला वाटते. पूजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत. मालिकेत मंजिरी आणि रायाचे विचार फार वेगळे आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात माझी आणि पुजाची छान मैत्री आहे. राया – मंजिरीच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं हीच इच्छा. 

टॅग्स :विशाल निकमस्टार प्रवाह