छोट्या पडद्यावरील 'वागळे की दुनिया – नयी पीढी नये किस्से' रोमांचक ट्विस्ट्ससह वागलेच्या जीवनातील दैनंदिन घटनांना सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोनी सब वाहिनीवरील हि मालिका प्रेक्षकांची आवडती आहे कारण मनोरंजनासोबतच या मालिकेने जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टींची शिकवणी देखील दिली आहे. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांची लाडकी आहेत. या मालिकेत सखी वागळेची भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही भूमिका अभिनेत्री चिन्मयी साळवी उत्तमरीत्या साकारतेय. नवरात्री निमित्त सखीने तिच्या काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला.
नवरात्री साजरी करण्याबद्दल चिन्मयी म्हणाली, ‘’मी स्वतः एक डान्सर आहे, म्हणून दर नवरात्रीला आमचा डान्स क्लास एक कार्यक्रम सादर करतो ज्यात मी आवर्जून सहभागी होते. या व्यतिरिक्त माझे मित्र-मैत्रिणी व मी आधी डोंबिवलीमध्ये गरबा खेळायला जायचो. आम्ही नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाच्या रंगाचे पोशाख परिधान करायचो आणि गरबाच्या वेगवेगळ्या स्टेप्स करताना खूप धमाल यायची. माझे काका मुलुंडमध्ये गुजराती सोसायटीत राहतात, म्हणून मी तेथे देखील गरबा खेळायला जायची. एक डान्सर म्हणून मला सर्व नृत्यप्रकार येतात आणि पारंपारिक गरबा खेळत असलेल्या ठिकाणी जायला मला आवडते. मालिका ‘वागळे की दुनिया’ या मालिकेत काम करायला लागल्यापासून माझे सेटवर देखील गुजराती मित्र-मैत्रिणी झाले आहेत.’’
दरम्यान चिन्मयीने हिंदी मालिकांसह ‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. चिन्मयी उत्तम ‘दम दमा दम’,फूल टू धमाल या डान्स शोचं विजेतेपदही पटकावलं आहे.