तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहचली. आज ती तिच्या खऱ्या नावापेक्षा दया बेन या नावानेच जास्त लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मालिकेत काम करत नाही. मात्र 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे चाहते दिशा वकानी या कार्यक्रमात परत कधी येणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत . ती २०१७ मध्ये मालिकेतून मॅटरनिटी लिव्हवर गेली आणि तेव्हापासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये परत आली नाही. मात्र तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतेच तिने आपल्या पहिल्या पगाराचा इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता.
कोईमोईला दिलेल्या मुलाखतीत दिशा वकानीने आपल्या करिअरबद्दल सांगितले आणि त्यावेळी तिने आपल्या पहिल्या पगाराचा अनुभव सांगितला. दिशाने गुजराती रंगभूमीवरुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असताना दिशाने एका व्यवसायिक नाटकात काम केले होते. या नाटकाचे तिने पाच प्रयोग केले होते. तिची भूमिका खूपच लहान होती. यासाठी तिला २५० रुपये पगार मिळाला होता. हे पैसे तिने आपल्या वडिलांना दिले होते. तिचा पहिला पगार पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पैसे तिच्या वडिलांनी अद्याप खर्च केलेले नाहीत. ते त्यांनी एखाद्या पुरस्काराप्रमाणे फ्रेम करुन ठेवले आहेत. हा अनुभव सांगताना दिशा फारच भावूक झाली होती.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दयाबेन परत येणार नसल्याचे समजते आहे. 'कोईमोई'च्या रिपोर्टनुसार, मॅटरनिटी लीव्हवरनंतर मेकर्स आणि दिशा वकानीमध्ये शोमध्ये येण्यासाठी चर्चा सुरु होती. निर्माते दिशा वकानीशी काही गोष्टींबद्दल चर्चा करीत होते, परंतु काही कारणांमुळे ही चर्चा निष्फळ ठरली. याच कारणास्तव दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधून कायमचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.