स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)च्या कथानक आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali)ने निभावली आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून बऱ्याचदा तो पोस्टमुळे चर्चेत येत असतो. आता पुन्हा एकदा त्याने इंस्टाग्रामवरील पोस्टमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्याने एका शाळेतील शिक्षकाच्या निवृत्तीचा व्हिडीओ शेअर करत आपल्या शाळेतील आणि शिक्षकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मिलिंद गवळीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा" सकाळी योगा प्राणायाम झाल्यानंतर , एखादा महत्वाचा मेसेज आला आहे का बघायला मोबाईल हातात घेतला, शारदाश्रम शाळेच्या ग्रुपमध्ये माझा वर्गमित्र भूपेन वरलीकरने एक व्हिडीओ शेअर केला होता. सहजच ओपन केला, एका शिक्षकाच्या निवृत्ती त्या दिवसाचा हा व्हिडीओ, पाहताना आधी नीटसं काही कळलं नाही, मग मात्र माझ्या डोळ्यातले अश्रू थांबेचना,डोकं सुन्न झालं, इतका सुंदर, इतका खरा प्रसंग मी खूप दिवसात पाहिला नाहीये, अख्खी शाळा रडत होती, हेडमास्तर, बरोबरचे शिक्षक मंडळी आणि सगळेच विद्यार्थी ढसाढसा रडतात, किती प्रामाणिकपणे आणि किती प्रेमाने या गुरुजींनी या मुलांना अनेक वर्ष शिकवला असणार, मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला असणार, आणि आज तो रिटायर होतोय, माझ्या सगळ्या गुरुजनांची, शिक्षकांची आठवण झाली. माझ्या दास गुप्ता टीचर, वर्गीस टीचर, सोनी टीचर, गोखले टीचर, शेट्टी सर, देशपांडे सर, कर्णिक टीचर , आकटे टीचर, कुमार सर, रायरीकर सर, आचरेकर सर, अमीन सयानी सर, परत लहान व्हावसं वाटतं, परत या सगळ्यां कडे प्रामाणिकपणे शिकावं असं वाटल, ज्यावेळेला हे सगळे शिक्षक मंडळी जिवओतून आम्हाला शिकवत होते, त्या वेळेला मात्र आम्ही उनाडक्या करत होतो, अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही, आज खूप वाईट वाटतं.