Join us

'अंतरपाट' मालिकेत लगीनघाई, थाटामाटात पार पडणार गौतमी-क्षितीजचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 3:11 PM

Antarpat Serial : 'अंतरपाट' मालिका चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या नव्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका 'अंतरपाट' (Antarpat Serial) ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या नव्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे. रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार आहे.

गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गौतमी आणि  तिच्या परिवाराने बाप्पाच्या चरणी पत्रिका अर्पण केली.  त्यानंतर त्या दोघांचे केळवण अगदी छान पारंपरिक पद्धतीने थाटामाटात  पार पडले. महाराष्ट्राची परंपरा आणि  सांस्कृतिक वैभव जपणारे  परंपराची उजळणी करून देणारे एक साधे सोज्वळ पण तितकेच सुंदर असे लग्न म्हणजे 'अंतरपाट' या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न. 

 गौतमी- क्षितिज यांचा विवाह विधी एखाद्या हॉलमध्ये न करता अत्यंत सुंदर  वेगळेपणा देणाऱ्या वाड्यात पार पडणार आहे. या वाड्यात झगमगती रोषणाई आणि सजावट न करता महाराष्ट्रीय संस्कृतीत महत्वाचे मानले जाणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजावट केली आहे. याशिवाय रांगोळी, फुलांची सजावट तसेच मराठमोळी संस्कृतीची ओळख असलेले आभूषण आणि येणाऱ्या पाहुण्यांना कोकणचा आनंद मिळावा, म्हणून वेलकम ड्रिंकमध्ये कोकणी शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत आणि पन्हं दिले आहे.त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांना अस्सल तुपाची धार सोडून मोदक देणार आहेत. शिवाय हे सगळे जेवण केळीच्या पानात दिले जाणार आहे.या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील. म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकत आहे. आजच्या ट्रेडिंगच्या काळात महाराष्ट्राची परंपरा सांगणारी 'अंतरपाट' या मालिकेतील गौतमी - क्षितिज यांचा लग्न सोहळा पाहायला विसरू नका..!