छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)चा पहिला एपिसोड २०१४ मध्ये रसिकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचा खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या शोच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम हे सर्व कलाकार घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमाने या सर्व कॉमेडियन्सला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन या विनोदवीरांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. दरम्यान आता शोबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. नुकतेच या शोला १० वर्षे पूर्ण झाले आहेत आणि आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.
चला हवा येऊ द्या शोला नुकतेच १० वर्षे पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्ताने विशेष एपिसोड सुरू आहे. त्यानंतर हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी नवीन मालिका भेटीला येणार आहेत. या शोचा सूत्रधार डॉ. निलेश साबळेने काही दिवसांपूर्वीच शोला रामराम केला. त्यानंतर या मालिकेचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे, कुशल बद्रिके करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच कुशल बद्रिकेने देखील 'झी मराठी'चे आभार मानणारे पत्र लिहिले. त्यानंतर तोदेखील शो सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. कुशल बद्रिके हिंदी रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, 'चला हवा येऊ द्या' बंद होणार आहे.
लवकरच नवीन मालिका भेटीलाएबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चला हवा येऊ देचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. मात्र, हा शो काळी काळ ब्रेक घेत आहे की फायनल पॅकअप आहे, हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, लवकरच झी मराठीवर दोन नवीन मालिका दाखल होत आहेत. या दोन्ही मालिका रिमेक असल्याची चर्चा आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तर, ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आहे.