स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे आणि चाहत्यांना या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. या मालिकेत आईची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. नुकतेच मधुराणीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या गालावरील जखमेबद्दल विचारले होते. अखेर अभिनेत्रीने त्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
मधुराणी लेकीसोबत सध्या व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. या दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्या गालावरील जखमेबद्दल विचारले. आता त्यावर मधुराणीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल सांगितले आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी आज माझ्या गालावरच्या जखमेविषयी बोलणार आहे. गेल्या वर्षात तिनी मला खूप शिकवलंय. स्वतः कडे आणि आयुष्याकडे बघायचा वेगळा दृष्टीकोण दिलाय. कदाचित तुम्हालाही ह्यातून काही हाती लागलं तर नक्की सांगा. नवीन वर्षाच्या खूप खूप खूप शुभेच्छा...!!!!
या व्हिडीओत मधुराणी प्रभुलकर म्हणाली की, दीड वर्षांपूर्वी माझ्या गालावर एक छोटासा फुगवटा दिसू लागला होता. त्याची तपासणी केली असता, तो सिस्ट असल्याचे कळले. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याचे ऑपरेशन झाले. या ऑपरेशननंतर काही महिने मी पट्टी लावून मालिकेत काम केले.
ती पुढे म्हणाली की, मला या जखमेचे आभार मानायचेत कारण तिने मला खूप काही शिकवलं. मला आठवतंय की पट्टी लावून एपिसोड केले तेव्हा क्लायमॅक्स आला होता सिरीयलचा तरीही प्रेक्षकांनी अरुंधतीवर भरभरून प्रेम केले. तिथेच मला या जखमेने स्वतःला स्वीकारायला शिकवले. माझ्यासाठी हा खूप मोठा धडा होता.काही दिवसांपूर्वी मधुराणीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ब्रेक घेतला होता. यावेळी देखील तिच्या गालावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी तिने सांगितले होते की, माझी एक छोटी सर्जरी झाली असल्यामुळे मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. लवकरच मी मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन.