स्टार प्रवाहवरीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. बाबासाहेबांचं मुंबई शहराशी खूप भावनिक नातं होतं. या शहराच्या उभारणीत जितकं देता येईल तितकं बाबासाहेबांनी भरभरून दिलं आहे. मग ती शहराची रचना असो, कॉलेजेस, लायब्ररी, वॉटर मॅनेजमेंट, ग्रीड सिस्टीम, कामगार चळवळ आणि बरंच काही. बाबासाहेबांच्या मुंबई वास्तव्यातल्या अनेक गोष्टी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून उलगडत आहेत.
पण तुम्हाला ठाऊक आहे का हे घर म्हणजे नेमकं मुंबईत कुठे होतं? ते आजही आहे का? काय आहे त्या घराचा इतिहास? बाबासाहेबांचे वडील म्हणजेच सुभेदार रामजीबाबांनी परेलमध्ये संपूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती. परेलच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांचं कुटुंब तब्बल २२ वर्षे रहात होतं. बाबासाहेबांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धगधगत्या आठवणी या वास्तुशी निगडित आहेत. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. बीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बी. ए. पूर्ण केले. खोली क्र. 50 मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र.51 स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केले.
बाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले, सार्वजिनक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास परेल इथल्या बीआयटी चाळीतल्या वास्तूस लाभला. या चाळीतून बाबासाहेब १९३४ ला दादरच्या नव्यानं बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५० नंबरची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी तर ५१ नंबरची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली.
बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक. जगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथे काही काळ घालवला तिथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान असल्याचं हे दोन्ही कुटुंबीय सांगतात. ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या वास्तूला अवश्य भेट देतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करुन माहितीही देतात. बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात.
भागुराम खैरे यांनी या ५१ नंबरच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. अगदी तेच दार, तोच कडीकोयंडा, खिडकीसुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंट आणि कोबा आहे. परळच्या बीआयटी चाळीने २०१२ मध्ये शंभरी पार केली आहे. बाबासाहेबांच्या वास्त्व्याने पावन झालेली ही वास्तू म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे.
‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांचा मुंबईतला प्रवास अनुभवायला मिळणं म्हणजे दुग्दशर्करा योगच. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळेल.