मुंबई - बिग बॉस मराठी सीझन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये स्पर्धक कोण असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. या नव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या बिग बॉस सीझन ४ ची कन्सेप्ट All is Well असणार असून याबाबत २ तारखेला गुपित उघड होईल असं या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी(BIGG BOSS Marathi) सीझन ४ सुरू होणार आहे. या बिग बॉसच्या घरात अनेक सेलेब्रिटी स्पर्धक म्हणून पाहायला मिळतात. मागील सीझनमध्ये तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या. या घरात एखादा राजकीय नेता असल्यास तुम्हाला कोणत्या नेत्याला पाहायला आवडेल असा प्रश्न पत्रकारांनी महेश मांजरेकर यांना केला. त्यावर मांजरेकर म्हणाले की, बिग बॉसच्या घरात संजय राऊतांसह राष्ट्रवादी, भाजपाच्या या नेत्यांना पाहायला आवडेल असं त्यांनी म्हटलं.
महेश मांजरेकर सांगतात की, अमोल मिटकरी हेदेखील खूप कडक बोलतात. ते बिग बॉसमध्ये असतील मज्जा येईल. त्याचसोबत भाजपा आमदार नितेश राणे यांनाही मला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल. संजय राऊत असते तर त्यांनाही बिग बॉसच्या घरात असलेले पाहायला आवडेल. ते वेगळा रंग या शोमध्ये भरू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी पडण्याची कुणकुण ६ महिने आधीच लागली होती राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार याची कुणकुण मला सहा सात महिन्याआधीच लागली होती. कुणाच्या माध्यमातून नव्हे तर कळालं होते. विचारधारा वेगवेगळ्या असलेले पक्ष एकत्र आले होते. तो फुगा फुटणं अपरिहार्य होते. एकाच फुग्यात हेलियम, साधा गॅस सगळं भरलं होतं. विचारधारा वेगळी असताना सरकार स्थापन झाले. ते कितपत टिकेल असं वाटलं होते. कुठला पक्ष चांगला आणि वाईट हा मुद्द नाही. माझ्या अपेक्षेपेक्षा १ वर्ष जास्तच टिकलं. उद्धव ठाकरेंनी तीन पक्षांना बांधून ठेवले असं महेश मांजरेकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.