झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तू तेव्हा तशी'(Tu Tevha Tashi)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच या मालिकेत अनामिका आणि सौरभ यांच्या प्रेमाला बहर आला आहे. पण आता राधा आणि नील यांच्यातही प्रेम फुलताना दिसणार आहे. मालिकेतील नीलची भूमिका स्वानंद केतकर(Swanand Ketkar)ने साकारली आहे.
अनामिकाच्या ऑफीसमध्ये काम करणारा एक मुलगा, जेमतेम परिस्थिती असलेला, माई मावशीच्या मेसमध्ये जेवणारा नील म्हणजेच स्वानंद केतकर आता कथेच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. नील ही भूमिका करणाऱ्या स्वानंद केतकरविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अनामिकाच्या मुलीच्या भूमिकेत रूमानी खरे पाहायला मिळते आहे. आजच्या तरूण पिढीचं प्रतिनिधीत्व करणारी राधा प्रेक्षकांनाही आवडते आहे. हितेनसोबत लिव्ह इन लेशनशीपमध्ये राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राधाला हितेनने नुकतच फसवल्याचे समोर आले आहे. राधावर प्रेम करणारा नील यामुळे सुखावला आहे. याच वळणावर राधा आणि नील यांच्यातील लव्ह ट्रॅक फुलणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढच्या भागात राधा आणि नील यांचीही लव्हस्टोरी पहायला मिळेल.
नीलची भूमिका करणाऱ्या स्वानंद केतकरची ही पहिलीच मालिका आहे. यापूर्वी स्वानंदने नाटक, एकांकिका याबरोबरच आपली सोसल वाहिनी या सेगमेंटमधून भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मालिकांमधून नवे चेहरे प्रेक्षकांसमोर येत आहेत, यामध्ये स्वानंदने नील ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वानंदचा सध्याचा ट्रॅक मुख्य प्रवाहात आल्याने तोही खूप खूश आहे.
नीलची भूमिका करणाऱ्या स्वानंदविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. मुंबईकर असलेल्या स्वानंदला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. कॉलेजमध्येच त्याला अभिनयाची गोडी लागली आणि त्याने खूप बक्षीसंही मिळवली. स्वानंदने कलाश्रय नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे ज्यामधून तो संगीत कार्यशाळा, वारली आर्ट यासारखे उपक्रम राबवतो. स्वानंद हा सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओही बनवत असतो. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या स्वानंदला तू तेव्हा तशी ही मालिका मिळाली तेव्हा त्याची भूमिका खूप छोटी होती. पण सुहास जोशी, स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम करायला मिळणार हीच गोष्ट त्याच्यासाठी भाग्याची होती असं तो सांगतो.
आता मात्र स्वानंदने साकारलेला नील हा राधाच्या निमित्ताने अनामिकाच्या घरातील प्रमुख सदस्य होणार आहे. राधाला खऱ्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनामिका आणि सौरभ यांच्या प्रेमाला साथ देण्यासाठी राधाचं मन वळवण्यातही नील म्हणजेच स्वानंदची भूमिका मालिकेत महत्त्वाची ठरणार आहे.