Join us

'आमच्या कामाचे पैसे आम्हाला का मागावे लागतात?', सिनेइंडस्ट्रीबाबत सुकन्या मोनेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 5:19 PM

Sukanya Mone : अभिनेत्री सुकन्या मोने अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत पाहायला मिळत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीकडे परतल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांनंतर आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दमदार भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने सुकन्या कुलकर्णी यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी सिनेइंडस्ट्रीतील एक खंत व्यक्त केली.

खरं तर मालिकेत काम केल्यानंतर कामाचे पैसे निर्मात्याला मागावे लागतात. मात्र या मालिकेचा अनुभव खूपच सुखद आहे, हे त्या आवर्जून सांगतात. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई ही मालिका खूप वेगळी असल्याचे त्या म्हणतात. सासूच्या त्याच त्याच भूमिका समोर आणण्यापेक्षा आताचे विषय समोर आणा हे त्या आवर्जून म्हणतात. अंबाडा साडी नेसणारी टिपिकल सासू अशीच एक तिची प्रतिमा मालिकांमधून तयार झालेली आहे. त्यामुळे आताच्या घडीच्या सासू दाखवल्या जाव्यात, याचे सीमोल्लंघन केले पाहिजे. माझी आई ८९ वर्षांची आहे पण ती सुद्धा बॉबकट करते. नखांना नेलपॉलिश लावते, ड्रेस घालते तर मग आपण का मालिकेतून टिपिकल आई दाखवायची. नाती तीच असतील पण कुठेतरी या विचारांना छेद जाणे गरजेचे होते.

झी मराठीने हे माझ्या सोबत घडवून आणले आहे म्हणू​​न मला ही भूमिका करताना खूप मजा येते. ही मालिका सुबोध आणि मंजिरी भावे यांनी आणली आहे. सुबोधचा या गोष्टीत हातखंडा आहे मात्र मंजिरी सुद्धा सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळते, असे त्यांनी सांगितले. मंजिरी सेटवर येताना आमच्यासाठी भरपूर काही खायला घेऊन येते. आमच्या आवडीनिवडी सुद्धा ती बघते. हे सगळे वातावरण नीट ठेवण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची असते. मात्र एक प्रश्न येतो तो म्हणजे पैशांचा. 

तर बरेचवेळा असे होते की आम्ही काम करतो पण आम्हाला पैशांसाठी निर्मात्यांना फोन करावे लागतात, मागावे लागतात. अशा वेळेला खूप वाईट वाटते की आपण त्यांच्यासाठी काम केले आहे. तुम्ही न सांगता आम्ही थांबतो ना. कधी एखादा सीन अर्धवट सोडून नाही जात ना. मग तसे न मागता पैसे द्या की आम्हाला. आम्हाला का मागावे लागतात आमच्या कामाचे पैसे. पण मंजिरीकडे काम करताना आम्हाला कधीच हे करावे लागले नाही. कान्हाज मॅजिक मधून आम्हाला समोरून चेक येतो. समोरून काही अडचण असेल तर दहा दिवसांत होईल असे सुद्धा सांगण्यात येते. त्यामुळे आम्ही निश्चिन्त असतो. म्हणून मग आम्हाला परत फोन करावा लागत नाही. त्या दृष्टीने सुद्धा मला हे अतिशय चांगलं असे प्रोडक्शन मिळाले. जिथे सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि महत्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रेमाने केल्या जातात.

टॅग्स :सुकन्या कुलकर्णी