'शक्तिमान' (Shaktimaan) मालिकेमुळे ९० च्या दशकात लहान मुलांचे आवडते बनलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna). 1997 ते २००५ अशी ८ वर्ष ही मालिका चालली. आज १९ वर्षांनी मुकेश खन्ना पुन्हा शक्तिमानच्या रुपात समोर आले आहेत. वयाच्या ६६ व्या वर्षीही ते मनोरंजन करायला आले आहेत. मात्र त्यांचा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलच केलं. कारण आता त्यांची शरीरयष्टी शक्तिमानसाठी शोभून दिसणारी नाही.
मुकेश खन्ना का आहेत अविवाहित?
मुकेश खन्ना यांनी आजपर्यंत लग्नच केलेलं नाही. इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करुनही ना त्यांच्या अफेअरची चर्चा झाली ना ते कोणाच्या प्रेमात पडले. काही लोकांनी गॉसिप करायला सुरुवात केली की मुकेश खन्ना यांनी भीष्म पीतामहची भूमिका साकारली होती. म्हणून त्यांनी भीष्माप्रमाणेच सदा ब्रह्मचार्याची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांची कोस्टार वैष्णवी महंत म्हणाल्या, "मुकेश खन्ना नेहमीच स्त्रियांपासून दूर दूर राहायचे. शूटिंग करताना ते सेटवर ना कोणत्या महिलेची गळाभेट घ्यायचे आणि ना ही त्यांना पाया पडायला द्यायचे. ते महिलांचा खूप आदर करतात."
एकदा मुकेश खन्ना यांनी स्वत:च लग्न न करण्याचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, "भीष्म पीतामहच्या भूमिकेमुळे मी लग्न केलं नाही हे साफ खोटं आहे. या गोष्टी केवळ अफवा आहेत. मी इतका महान नाही. कोणीही त्यांच्यासारखं बनू शकत नाही. माझा तर लग्नसंस्थेवर खूप विश्वास आहे. जर माझं लग्न व्हायचं असतं तर झालं असतं. लग्न होणं हे नशिबावर असतं. पण ही माझी वैयक्तिक बाब आहे."