आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका बंद झाली असली तरी या मालिकेतील कलाकार आणि कथानकाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार चर्चेत येत असतात. दरम्यान मधुराणी प्रभुलकर ( Madhurani Prabhulkar) अलिबागमधील कुलाबा किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंतदेखील व्यक्त केली.
मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या ‘ कुलाबा किल्ल्याला’ भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. किती काय काय आहे तिथे … दगडी भक्कम तटबंदी, त्या काळातल्या तोफा , उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, भवानी माता मंदिर , समुद्रात बांधलेल्या हया किल्ल्याच्या मधोमध असणारी गोड्या पाण्याची विहीर … मला अजून माहिती हवी होती ह्या किल्ल्याबद्धल पण ती देऊ शकणारा गाईड सुद्धा तिथे नव्हता. खंत वाटली. किती अप्रतीम महत्वाची ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत आपल्या महाराष्ट्रात पण ह्या कडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?