मोहित मलिकला का येतेय त्याच्या आईची आठवण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 12:20 IST
अभिनय क्षेत्रातील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेता मोहित मलिक तब्बल दशकभरापूर्वी दिल्लीहून मुंबईत स्थायिक झाला होता. पण आजही त्याला ...
मोहित मलिकला का येतेय त्याच्या आईची आठवण ?
अभिनय क्षेत्रातील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेता मोहित मलिक तब्बल दशकभरापूर्वी दिल्लीहून मुंबईत स्थायिक झाला होता. पण आजही त्याला त्याच्या आईच्या हातच्या लस्सीची तीव्रतेने आठवण येते. दिवसेंदिवस उकाडा वाढत असून या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अभिनेते विविध उपाय योजित असतात. आपल्या ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेतील भूमिकेसाठी मोहित मलिकला वेगवेगळ्या स्थळांवर तसेच मुंबईतील स्टुडियोत जावे लागते. या भटकंतीत उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी मोहित विविध फळांचे रस पीत असला, तरी त्याला लहान असताना त्याची आई जी लस्सी करून देत असे, त्याची फार आठवण येत आहे. “यंदा उन्हाळ्याला लवकरच सुरुवात झाली असून हा उकाडाही खूपच जास्त आहे. मी कालच माझ्या आईशी बोलत होतो. तेव्हा मी तिला सांगितलं की मला तिच्या हातच्या जेवणाची आणि लस्सीची फार आठवण येते. ती इथे राहात असती, तर फार बरं झालं असतं,” असे मोहितने सांगितले.आपल्या पत्नीसह मुंबईत राहणारा मोहित विविध फळांचे रस तसेच स्मूदीज पिऊन शरीरात पुरेसे द्रवपदार्थ ठेवण्याचा आणि उकाड्यापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे.काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या चित्रीकरण दरम्यान मोहित भावनिक झाला होता. मालिकेतील एक अतिशय गंभीर आणि भावनाप्रधान प्रसंगाचे चित्रीकरण पार पडल्यानंतर मोहित या प्रसंगात इतका गुंतून गेला होता की, आपल्याशी पुढील तीन तास कोणीही संपर्क साधू नये, अशी सूचना त्याने सेटवरील सहकलाकार आणि कर्मचाऱ्यांना केली. या घटनेबद्दल त्याच्याकडे विचारणा केली असता मोहित सांगतो, आजपर्यंत मी विविध मालिकांमध्ये वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे प्रसंग चित्रीत केले आहेत. परंतु या मालिकेत मी नुकताच जो प्रसंग चित्रीत केला, त्याचा सखोल परिणाम माझ्या मनावर झाला असून या प्रसंगाच्या अखेरीस मला माझ्या भावना नियंत्रणात ठेवता आल्या नाहीत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासारखी माझी मानसिक अवस्था नव्हती. म्हणूनच मी मला कोणीही भेटू नये, अशी विनंती केली होती. माझ्या मनावर सिकंदर या व्यक्तिरेखेइतका प्रभाव अन्य कोणत्याच भूमिकेने टाकलेला नाही. मला ही भूमिका रंगविण्यास मिळाली, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो.”