बच्चेकंपनीला कार्टून किती आवडतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्यापैकी सर्वांनीच बालपणी कार्टूनची मजा घेतली आहे. टॉम अॅण्ड जेरीपासून स्कूबी डू, बेन 10 असे अनेक कार्टून शो आणि त्याच्या आठवणी आजही आपल्यापैकी अनेकांच्या मनात जिवंत आहेत. ज्या कार्टून नेटवर्क चॅनलवरचे कार्टून शो पाहून आपण लहानाचे मोठे झालो त्याच ‘कार्टून नेटवर्क’ या चॅनलची सध्या चर्चा आहे. होय, ट्विटरवर 15 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून ‘ #RIPCartoonNetwork ’ ट्रेंड होत आहे. लोक कार्टून नेटवर्कला श्रद्धांजली वाहत आहेत.
कार्टून नेटवर्क हे चॅनल वार्नर ब्रदर्ससोबत मर्ज (विलिनीकरण) होणार असल्याची बातमी आली आणि कार्टून नेटवर्क बंद होणार असल्याचं लोकांनी खरं मानलं. ही बातमी लगेच व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर #RIPCartoonNetwork ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. कार्टून नेटवर्कला श्रद्धांजली वाहणाऱ्या एक ना अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात. आमचं बालपण सुंदर करण्यासाठी धन्यवाद कार्टून नेटवर्क..., श्रद्धांजली..., अशा आशयाच्या पोस्ट लोक करू लागले.
कार्टून नेटवर्कने दिलं स्पष्टीकरण
कार्टून नेटवर्कला लोकांनी श्रद्धांजली अर्पण करायला सुरूवात केल्यानंतर चॅनलने लगेच यावर स्पष्टीकरण दिलं. ‘आम्ही अजून संपलेलो नाही. फक्त आम्ही आमची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. आमच्या प्रिय चाहत्यांनो आम्ही कुठेही जाणार नाही... सर्वांच्या आवडत्या व नवनवीन कार्टूनसह आम्ही तुमच्या घरात होतो आणि नेहमी असू. लवकरच खूप काही येणार आहे...,’असं ‘कार्टून नेटवर्क’ने स्पष्ट केलं.‘कार्टून नेटवर्क’च्या या स्पष्टीकरणानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला. अर्थात ‘कार्टून नेटवर्क’च्या विलिनीकरणाबद्दल अजूनही कोणती ठोस माहिती हाती आलेली नाही. पण तूर्तास तरी ‘कार्टून नेटवर्क’ इतक्यात तरी बंद होणार नाही हे नक्की.