या मालिकेच्या विजेत्यांना मिळाली कलाकारांना भेटण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 5:26 AM
आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे,त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेला ...
आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे,त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे.प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केले.या प्रेमापोटीच या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना एक अमूल्य संधी ‘जगदंब क्रिएशन’ व झी मराठीने उपलब्ध करून दिली होती. या मालिकेवर आधारित एका प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सोशल मिडीयावर करण्यात आले होते.या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील २५ भाग्यवान विजेत्यांनी नुकतीच ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेतली.‘छत्रपती संभाजी महाराजांच्या' जयंती निमित्त या भेटीचा योग जुळून आला होता. या २५ भाग्यवान विजेत्यांना 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील संपूर्ण टीमला प्रत्यक्ष भेटून त्याच्यांशी गप्पागोष्टी करता आल्या.या कलाकारांबरोबर गप्पागोष्टी आणि धम्माल, तसेच विजेत्यांचे मालिकेबद्दलचे मनोगत असा फक्कड कार्यक्रम 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या सेटवर रंगला होता. याप्रसंगी शाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्याच्या सादरीकरणाने संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले.वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे छत्र हरवले. मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचे बाळकडू त्यांना मिळाले.अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणाने भल्याभल्यांना चकित केले. आग्र्याहून सुटकेनंतर मथुरा ते राजगड प्रवास एकट्याने केला. पण युवराजपदी शंभूराजे विराजमान झाले आणि राजारामांच्या जन्मानंतर सुरू झालेल्या कुटुंबकलहाने डोके वर काढले. कारस्थानी कारभाऱ्यांनी स्वार्थासाठी महाराणी सोयराबाईंच्या मातृसुलभ भावनेला फुंकर घातली. आरोप आणि बदनामीची धुळवड शंभूराजांच्या आयुष्यात सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य आणि शंभूराजे दोन्ही पोरके झाले. घरातील वादळ सुरू असतानाच स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशहा हे सारे शत्रू एकाचवेळी सज्ज झाले. त्यात भर म्हणून खुद्द शहेनशहा औरंगजेब अफाट सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. स्वराज्य धास्तावलं, स्वराज्याला प्रश्न पडला आता काय करेल शिव सिंहाचा छावा? कसा समोर जाईल या सुलतानी आक्रमणाला? छातीवर संकट झेलताना घरभेद्यांकडून तर वार होणार नाही ना? काय ठरवेल इतिहास शंभूराजांना स्वराज्यविध्वंसक की स्वराज्यरक्षक? याच आणि अशाच अनेक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे कथासूत्र आधारित आहे.