Join us

"बाईला पुरुषापेक्षा मिळतात कमी पैसे...", अतिशा नाईक कलाविश्वातील मानधनावर स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 09:40 IST

Atisha Naik : अभिनेत्री अतिशा नाईक यांनी एका मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीत मानधनाच्याबाबतीतही स्त्री-पुरुष असा भेदभाव पाहायला मिळत असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. बालकलाकार म्हणून त्यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. 'घाडगे आणि सून', 'सुंदरी', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा मालिकांमधून त्या घराघरात पोहचल्या आहेत. दरम्यान आता नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत मानधनाच्याबाबतीतही स्त्री-पुरुष असा भेदभाव पाहायला मिळत असल्याचे म्हटले आहे.

अलिकडेच अतिशा नाईक यांनी लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांच्या आरपार ऑनलाइन या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी मुग्धा गोडबोले यांनी अतिशा नाईक यांना म्हटलं की, ''सिनियोरिटी आणि मग त्यातून तुम्हाला मिळणाऱ्या सवलती जर तुम्हाला त्या घ्यायच्या असतील तर आणि त्यातून मिळणारे पैसे हे प्रमाण व्यस्तच राहणार. यावर अतिशा नाईक म्हणाल्या की, हो. का नाही होणारच ना ते प्रत्येकजण आपापला फायदा बघणार. जेव्हा क्रेडिट असते तेव्हा डेबिट असते. जेव्हा डेबिट असते तेव्हा क्रेडिट असते.  तुम्ही दोन पैसे कमी घ्या. तुमचे दहा तासात काम करुन तुम्ही जा. तुमच्याकडे वेटो राहतो. मी कमी पैसे घेते ना. मग आता कशाला थांबवतात असं म्हणू पण शकता.''

''कष्टाला तुम्ही प्राधान्य द्या.''

पुढे मुग्धा गोडबोले म्हणाल्या की, ''त्यातही टेलिव्हिजनमध्ये अंग मेहनत खूप असते. पंधरा पंधरा तास काम असते. त्यावर अतिशा यांनी सांगितले की, पैसेही कमी मिळतात बाईला पुरुषापेक्षा आणि हे पण आहे. आणि हे सगळीकडे आहे. आता शाहरुख खानने पहिले दीपिका पादुकोणचे नाव दिलं आणि नंतर त्यांचं आलं. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे. हे अधोरेखित करावं लागतंय. आमच्या ह्याच्यात पण सुनील बर्वेने केले. मी जेव्हा त्याला म्हटलं की अरे तर पहिली बायकांची नावं येतात. मग पुरुषांची येतात, हे कन्सिडर केलंय. ह्याच्यामध्ये कुठेही बाईला प्राधान्य द्या हा मुद्दा नाहीये. कष्टाला तुम्ही प्राधान्य द्या.''

टॅग्स :अतिशा नाईक