८ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील स्त्रियांना आजच्या दिवशी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अनेक सेलिब्रिटीही महिला दिनानिमित्त खास पोस्ट शेअर करत आहेत. बिग बॉस मराठी फेम अभिनेता पंढरीनाथ कांबळेनेदेखील महिला दिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. पॅडीने त्याच्या पोस्टमधून एक मोलाचा सल्लाही दिला आहे.
पॅडीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नी आणि लेकींसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने आई, पत्नी आणि त्याच्या दोन लेकींसाठी महिला दिनानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे.
पंढरीनाथ कांबळेची पोस्ट
माझं करिअर घडण्यामध्ये लग्नाआधी माझ्या आईचा आणि लग्नानंतर माझ्या पत्नी अनिताचा फार मोठा हातभार आहे. त्यामुळे या स्त्रियांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनोरंजनासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करताना बऱ्याचदा मनाने खचण्याची शक्यता जास्त असते. आणि या क्षेत्रात येण्यासाठी एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला जास्त संघर्ष करावा लागतो. तसा संघर्ष मलाही चुकला नाही. पण माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली.
तिच्यानंतर माझी पत्नी अनिताने मला आतापर्यंत खंबीर साथ दिली. माझ्या नाटक, सिनेमाच्या वेडापायी मी घरी फारसा लक्ष देत नव्हतो. पण अनिताने कधीच कुठली तक्रार न करता घराची पूर्ण जबाबदारी खूप चांगली सांभाळली.
ग्रीष्मा आणि आद्या या माझ्या दोन मुलींनीही माझ्या आयुष्यात रंग भरले. मीही त्यांना कधी कुठल्या गोष्टीसाठी आडकाठी केली नाही. मी आज जो काही आहे, तो माझ्या कुटुंबातल्या या स्रियांमुळे आहे. मीही माझी पत्नी आणि मुलींच्या मागे कायम ठामपणे उभा राहीन. त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी खंबीर स्त्री असते. जिच्यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो. आयुष्याचा प्रवास सुकर होतो. तुम्हीही तुमच्या आयुष्यातल्या अशा स्त्रियांचा नेहमी आदर करा. त्यांना सन्मानाने वागवा. त्यामुळे आजच्या जागतिक महिला दिनी मी त्यांना सलाम करतो आणि शुभेच्छा देतो.
पॅडीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.