पार्टनर्स फेम विपुल रॉय अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचा हे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 7:36 AM
एखाद्याच्या यशात किंवा अपयशातही नशिबाचा वाटा मोठा असतो. बॉलिवुड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्याला असे अनेक जण माहीत आहेत, ज्यांनी ...
एखाद्याच्या यशात किंवा अपयशातही नशिबाचा वाटा मोठा असतो. बॉलिवुड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्याला असे अनेक जण माहीत आहेत, ज्यांनी अभिनयाचा ध्यास घेऊन आपली सेटल झालेले करिअर मागे सोडले. असाच एक कलाकार आहे विपुल रॉय. सोनी सबवरील पार्टनर्स-ट्रबल हो गयी डबल या मालिकेत विपुल इन्स्पेक्टर आदित्यची भूमिका साकारत आहे. हा प्रतिभावान अभिनेता या क्षेत्रात येण्यापूर्वी एक यशस्वी शेफ होता. मात्र, अभिनयात काहीतरी करून दाखवण्यासाठी त्याने त्याच्या या करियरला रामराम ठोकला.विपुल पूर्वी व्यवसायाने शेफ होता. त्याला जेवण बनवण्याची आवड असल्याने एका रेस्टॉरंटमधून आपल्या कामाची सुरुवात केली आणि त्यानंतर तो मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलात शेफ बनला. अनोख्या आणि नाविन्यपूर्ण रेसिपीजसाठी तो प्रसिद्ध होता. या क्षेत्रात त्याने बरीच प्रसिद्धीही मिळवली होती. जेवणाबद्दलची आपली आवड त्याने अनेक वर्षं जपली. मात्र बऱ्याच काळानंतर त्याला वाटले की आपण अभिनय करायला हवा. अभिनयाची ही आवड त्याला एका अभिनय स्पर्धेपर्यंत घेऊन गेली आणि तिथे त्याने अंतिम फेरीत स्थानही मिळवले. त्यानंतर त्याने आपल्या या अभिनयावरील प्रेमाला काही वेळ देण्याचे ठरवले. त्यामुळे दिवसा अभिनेता आणि रात्री शेफ असे दुहेरी आयुष्य त्याला जगावे लागले. त्याने प्रामाणिकपणे या दोन्ही आवडींना जपले. त्यानंतर त्याने एका प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवून आपली अभिनय क्षमता सिद्ध करून दाखवली. करिअरमधील या जबरदस्त बदलाविषयी विपुल सांगतो, "अभिनयाच्या क्षेत्रातील माझा प्रवास खरंच फार वेगळा आणि उत्कंठावर्धक आहे. मी एका प्रसिद्ध रिअॅलिटी शोमधून हा प्रवास सुरू केला आणि एफ.आय.आर. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. आता पार्टनर्स-ट्रबल हो गयी डबलमधील माझी भूमिका तर मी आजवर साकारलेल्या भूमिकांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. जेवण बनवण्याबद्दल बोलायचं तर तो माझा आत्मा आहे. आजही जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मी स्वत: जेवण बनवतो. सोबत मंद संगीत लावून मी माझा एकांत एन्जॉय करतो. जेवण बनवणं हे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. मी नेहमीच नव्या पाककृतींचे प्रयोग करत असतो. तसेच कॉकटेल्स आणि मॉकटेल्समध्ये काहीतरी वेगळं करून पाहत असतो. नुकतंच मी एक नवीन कॉकटेल बनवलं, त्याचं नाव आहे 'गुडनाइट' आहे. पाच वेगवेगळ्या ड्रिंक्सचे मिश्रण असलेलं हे ड्रिंक आहे. शेफ ते अभिनेता हा माझा प्रवास काहीसा आगळावेगळा आहे. शेफच्या कामाची पार्श्वभूमी असताना मनोरंजन क्षेत्रात येणे, हे फारच भन्नाट आहे."Also Read : पार्टनर ट्रबल हो गई डबल या मालिकेचे १०० भाग पूर्ण, आता होणार नेहा पेंडसेची मालिकेत एंट्री